Join us

या कारणामुळे अभिनेता शेखर फडकेला एका बाईने दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 09:35 IST

शेखर फडकेला एका बाईने दिला चोप हे वाचून शेखरने काय केले की, त्याला एका बाईने मारले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण शेखरने काहीही केलेले नसताना त्याला मार खावा लागला आहे. शेखरने मार का खाल्ला याचे उत्तर खूपच मजेशीर आहे.

मुंबई : शेखर फडकेला एका बाईने दिला चोप हे वाचून शेखरने काय केले की, त्याला एका बाईने मारले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण शेखरने काहीही केलेले नसताना त्याला मार खावा लागला आहे. शेखरने मार का खाल्ला याचे उत्तर खूपच मजेशीर आहे. शेखर सध्या एका मालिकेत काम करत आहे. याच मालिकेमुळे त्याच्यावर मार खाण्याची वेळ आली. शेखरला एका बाईन चोप दिला असल्याचे शेखरनेच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून सगळ्यांना सांगितले आहे. शेखरला मार का खावा लागला हे वाचल्यावर तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

शेखर सध्या स्टार प्रवाह वरच्या कोठारे व्हिजन निर्मित, विठू माऊली या मालिकेत हरीभाऊ ही व्यक्तिरेखा साकारतोय. या भूमिकेमुळे त्याला एका आजीने भररस्त्यात छत्रीने मारले. याविषयी शेखरने फेसबुकवर लिहिले आहे की, एका आज्जीने (वय 60, राहणार भांडुप), पुंडलिकाला (छोटा पुंडलिक, विठ्ठलाचा भक्त) त्रास देतो म्हणून मला छत्रीने चोप दिला. सुरुवातीला मला काही कळेना.... तिकडे उपस्थित असलेले बाकी लोक मी आजींना काहीतरी केले असेल असा समज करून माझ्याकडे खुन्नसने बघत होते. त्यामुळे त्वरित मी आजींना विचारलं, काय झालं तुम्ही मला का मारत आहात? एवढेच नव्हे तर घाबरून त्या आधी उगाच माफीही मागितली. तेव्हा त्या म्हणाल्या, खबरदार माझ्या पुंडलिकाला त्रास दिलास तर, तू ही विठ्ठलाचा भक्त हो, म्हणजे तुझी कुकर्म धुतली जातील... आणि त्या निघून गेल्या... मग मला हायसे वाटले. तिथल्या जमलेल्या लोकांना मी सांगितले की, मी एका मालिकेत खलनायक साकारतोय. त्यामुळे हे असे झाले, तेही हसले आणि मीही हसलो... आणि आजीने छत्रीने दिलेली पाश्व भागावरची पावती (दुखरी पण हवीहवीशी) घेऊन घरी गेलो. आम्हा प्रत्येक कलाकाराला नेहमीच, आम्ही करत असलेल्या कामाची पोच पावती हवी असते. या आजींनी मला मारणे म्हणजे त्यांनी मला दिलेली ही पोच पावतीच आहे असेच मी म्हणेन.