Join us

'पेट पुराण'मुळे सई ताम्हणकरची ही भीती पळाली दूर, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 5:14 PM

Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज पेट पुराण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही पाळीव प्राण्‍यांचे पालनपोषण करण्‍यावरील उत्‍साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे. हलक्या-फुलक्या सुखद क्षणांनी भरलेली आणि महाराष्‍ट्रीयन पार्श्‍वभूमीवर आधारित ही सिरीज शहरी, उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती आणि त्‍यांचे दत्तक घेतलेले पाळीव प्राणी बाकू नावाची मांजर व व्‍यंकू नावाचा कुत्रा यांच्‍या अपारंपारिक, परिपूर्ण जीवनाला दाखवेल.

नुकतेच सोनीलिव्‍हने पेट पुराण या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि या ट्रेलरला लाखो पाळीव पाणी पालकांकडून उत्तम अभिप्राय मिळत आहेत. कुटुंबामध्‍ये पाळीव प्राणी आणणारे अतुलनीय प्रेम दाखवणाऱ्या या सीरिजमध्‍ये सई ताम्‍हणकर स्‍वावलंबी, प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली, पण भावूक महिला अदितीची भूमिका साकारणार आहे. अदिती पाळीव प्राण्‍याची पालक बनते तेव्‍हा तिच्‍यामध्‍ये आनंद व भावनेसोबत मातृत्‍व निर्माण होते. रोमांचक बाब म्‍हणजे वास्‍तविक जीवनात अभिनेत्री तिच्‍या या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. ''मला एक अभिनेत्री म्हणून पाळीव प्राण्याच्या पालकाची भूमिका साकारण्याबाबत खात्री नव्हती, कारण पाळीव प्राण्यांशी भावनिकदृष्ट्या किती मिसळून जाईन हे माहीत नव्हते. पण आम्‍ही चित्रीकरणाला सुरूवात करताना पाळीव प्राणी मला माझ्या मुलांसारखेच वाटले आणि काम करताना कामासारखे वाटले नाही. त्‍यांच्‍यामागून धावणे आणि नेहमी माझ्यासोबत असण्‍याचा अनुभव उत्तम होता. खरेतर, मी कधीकधी ते अवतीभोवती असण्याचे मिस करायचे. मला खात्री आहे की, ही सिरीज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या पाळीव प्राण्‍यांसोबतचे अनुभव आठवतील.

तिने पुढे म्हटले की, ट्रेलर लाँच झाल्यापासून प्रेक्षक एकत्र येऊन पाळीव प्राण्‍यांचे पालक असण्‍याबाबत चर्चा करत आहेत आणि याबाबत काही अद्भुत कथा दिसण्‍यात आलेल्‍या आहेत. मी आशा करते की, आमची सिरीज अधिकाधिक लोकांना पाळीव प्राणी दत्तक घेण्‍यास प्रेरित करेल. ही सिरीज निश्चितच तुम्‍हाला अवतीभोवती असलेल्‍या केसाळ मित्रांच्‍या प्रेमात पाडेल. माझेच उदाहरण घ्‍या! मला आता प्राणी खूप आवडू लागले आहेत.

'पेट पुराण'चे दिग्‍दर्शन व लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केले असून ह्यूज प्रॉडक्‍शन्‍सचे रणजित गुगले हे या सिरीजचे निर्माते आहेत. सई ताम्‍हणकर व ललित प्रभाकर अभिनीत ही सिरीज ६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्‍याळम, कन्‍नड व बंगाली या भाषांमध्‍ये सोनीलिव्‍हवर सुरू होणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरललित प्रभाकर