बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या चॉकलेट इमेज आणि लव्हर ब्वॉय चार्ममुळं चित्रपटरसिकांना वेड लावलं.रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच विरहगाथा त्यांनी कधी हसवत तर कधी डोळ्यात आसवं आणत निभावल्या आणि इतिहास रचला.राजेश खन्ना यांच्यासह काम करायला मिळावं अशी प्रत्येक हिरोईनची इच्छा असायची. मात्र एका हसीनासाठी खुद्द सुपरस्टारचं हृदय घायाळ झालं. ती होती डिंपल कपाडिया. डिंपल राजेश खन्ना यांच्या स्वप्नांची नाही तर प्रत्यक्ष जीवनातली रानी बनली. बॉबीमधल्या डिंपलवर राजेश खन्ना फिदा झाले.अहमदाबादच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. डिंपल त्यांवेळी 15 वर्षाची होती. दोघांच्या वयात 15 वर्षाहून अधिकचं अंतर होतं. मात्र प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात.डिंपलच्या वडिलांनाही लेकीच्या निवडीवर सार्थ अभिमान होता.1973 साली दोघंही रेशीमगाठीत अडकले.
राजेश खन्ना-डिंपलचा संसार आशीर्वाद बंगल्यात सुरु झाला.त्यांच्या दोन लेकी ट्विंकल आणि रिंकीचा जन्मही इथंच झाला.मात्र काही दिवसांतच राजेश खन्ना आणि डिंपलच्या नात्यात दुरावा आला.दोघांनीही काडीमोड घेत आपापलं करियर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. असं काय घडलं की एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोघांचे नाते इतकं बिघडलं की डिंपल कपाडियाचा चेहरा पाहणे देखील राजेश खन्ना पसंत करत नव्हते.राजेश खन्ना यांच्या मनात पत्नी डिंपलमुळे प्रचंड राग निर्माण झाला होता.
डिंपलविषयी त्यांच्या मनात इतका द्वेष निर्माण झाला होता ते त्यांच्या निधनानंतरही स्पष्ट झाले होते. कोट्यावधी संपत्तीचे मालक असणारे राजेश खन्ना त्यांच्या सर्व संपत्ती डिंपलला वगळून त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे केली. राजेश खन्ना यांनी पत्नीला संपत्तीतून एक रुपयासुद्धा दिला नाही. मुळात राजेश खन्ना यांच्याशी लग्न करण्यापूर्वी डिंपलसमोर एक अट ठेवण्यात आली होती की, लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाही, पण डिंपलने राजेश खन्नाची अट मान्य केली तरीही चित्रपटांमध्ये काम करणं सुरुच ठेवले होते. त्यामुळे राजेश खन्ना खूप दुखावले गेले होते. याच कारणामुळे राजेश खन्ना यांनी त्यांच्या संपत्तीतून एक पैसाही डिंपलला दिला नसल्याचे बोललं जातं.