Join us

तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:53 PM

Taapsee pannu: लंडनचे लोक तापसीला खरोखर भिकारी समजून पैसे देत होते. हा किस्सा स्वत:सांगितला आहे

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Sharukh Khan) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला डंकी (Dunki)  हा सिनेमा अखेर आज रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये तगडी स्टारकास्ट झळकली असून सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चिला जात आहे. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख आणि तापसी पन्नू  (Taapsee Pannu) या जोडीने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. इतकंच नाही तर या सिनेमात अभिनेता विकी कौशलदेखील (Vicky Kaushal) झळकला आहे. त्यामुळे हा सिनेमा एक प्रकारे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरत आहे. यामध्येच सिनेमाच्या सेटवर तापसीसोबत एक भन्नाट किस्सा घडला होता. काही लोकांनी तिला भिकारी समजून चक्क पैसे दिले होते.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाचं लंडनमध्ये चित्रीकरण पार पडत होतं. यावेळी काही लोकांनी तापसीला भिकारी समजलं आणि तिला चक्क पैसे दिले. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने हा किस्सा सांगितला. या सिनेमामध्ये तापसीने एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. पंजाबमधील एका लहानशा शहरात वाढलेली ही मुलगी विदेशात जाऊन तिचं वेगळं जग तयार करते. तिथे सेटल व्हायचा प्रयत्न करते, अशी एकंदरीत तिची भूमिका आहे.  त्यामुळे त्याच्या भूमिकेचं काही शुटिंग लंडनमध्ये पार पडलं. तापसीच्या या सीनचं शुटिंग सुरु असतानाच लोक तिला भिकारी समजले होते.

"या सिनेमाममध्ये पेटीजवळ जो स्टॅच्यू दिसतोय ती मी आहे. हा सीनचा एक भाग होता माझ्यासमोर असलेल्या पेटीमध्ये सिनेमामधीलच काही लोकांना पैसे टाकायचे होते. हा सीन सुरु असताना लंडनच्या लोकांना असं वाटलं मी खरोखरच भिकारी आहे आणि त्यांनी पैसे टाकायला सुरुवात केली. त्यांना कळलंच नाही की हा शुटिंगचा भाग आहे", असं तापसी म्हणाली.

दरम्यान, 'डंकी' या सिनेमात शाहरुख, तापसी, विकी कौशल, बोमन इराणी यांसारखे तगडे कलाकार झळकले आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. तसंच या सिनेमाची धडक सालार या सिनेमासोबत होणार आहे. २२ डिसेंबरला प्रभास स्टारर सालार हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :तापसी पन्नूशाहरुख खानविकी कौशलबोमन इराणीराजकुमार हिरानीसिनेमा