रेतीसम्राटांच्या काळ्या साम्राज्याला थेट भिडणारा व वाळूमाफियांचा विषय बेधडकपणे मांडण्यात आलेल्या ‘रेती’ या चित्रपटाची पहिली झलक आज प्रेक्षकांच्या समोेर आली आहे. देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात अनिर्बंधपणे सुरू असलेली वाळूची स्मगलिंग तसेच अगणित काळ्या पैशांसाठी बिनधास्तपणे वावरत असलेले वाळूमाफिया, भ्रष्ट सरकारी अधिकारी, पोलीस अन् राजकारण्यांची साखळी यावर या चित्रपटामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. वाळूमाफियांच्या निशाण्यावर असलेला रेती हा सिनेमा ८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये लाँच करण्यात आला.बॉलीवूडचा सुपरस्टार गायक शान याचा मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील आवाज पोहोचला आहे. आता पुन्हा हा गायक रेती या चित्रपटातून आपला आवाज पोहोचविण्यास सज्ज झाला आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना शान म्हणाला, रेती हा मराठी चित्रपट वास्तव परिस्थितीशी संबंधित असून, समाजाला एक नवीन विचार देणारा हा चित्रपट आहे. या सामाजिक चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच मला छान मराठी लिहिता-वाचता व स्पष्ट बोलतादेखील येते. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. तसेच मराठी इंडस्ट्री ही भरारी घेत आहे, त्यामुळे ‘यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना.’ चिन्मय त्याच्या भूमिकेविषयी म्हणतो, ‘‘शंकऱ्या ही अशी व्यक्ती आहे, जी आपल्या प्रेयसीवर जिवापाड प्रेम करीत असते. तिच्यासाठी काहीही करायला तो तयार असतो. तसेच तो ट्रक ड्रायव्हर असल्याने त्याचे त्याच्या ट्रकवर अत्यंत प्रेम असून तो लाडाने त्याच्या ट्रकला राणी म्हणतो. ट्रकमधून वाळू वाहून नेत असताना या माफियांच्या राज्यात आपल्यालाही वरपर्यंत पोहोचायचेय, अशी आकांक्षा बऱ्याच लोकांची असते. त्याला आपल्या लोकांविषयी जेवढे प्रेम आहे, तेवढाच तो दुसऱ्याचा जीव घेताना विचार न करणारा कठोरदेखील असतो. एक प्रकारचा निबरपणा या कॅरेक्टरमध्ये आहे.’’ शंकऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सुलीची भूमिका ‘रेती’मध्ये गायत्री साकारत आहे. ती म्हणते, ‘‘कथेला रिक्वायरर्ड असा हा रोल असल्याने जेवढी प्रेमकथा दाखवायला पाहिजे, तेवढी ती दाखविली आहे. उगाचच भूमिका खेचलेली नाही. त्यामुळे ते रोमँटिक सीन्स पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना आवडतील.’’शशांक शेंडे यांनी वाळूमाफियाची भूमिका यामध्ये साकारली असून, ते म्हणतात, ‘‘प्रकाश झा ज्याप्रमाणे सत्यघटनांवर आधारित चित्रपट बनवितात, तसाच रेती हा सिनेमादेखील रंजक घटनेवर आधारित आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये चांगला अॅक्शन थ्रिलर सिनेमा आलाय. रेती ही फिल्म चित्रमाध्यमाच्या इतकी जवळ जाणारी आहे, की मी ती म्यूट करूनदेखील पाहू शकतो. संवादांची गरज भासत नसून मूक चित्रपटदेखील तुम्हाला समजू शकतो, ही कमाल स्क्रीन प्ले अन् डिरेक्शनची आहे.’’ चित्रपटाचे शूटिंग रीअल लोकेशनवर जाऊन आम्ही केले आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात ११० मल्टिप्लेक्स आणि १०० सिंगल स्क्रीनवर लागणार आहे. मार्केटिंगच्या बाबतीत आपण बॉलीवूडला कॉपी करतोय. प्रमोशन करण्यापेक्षा तुमच्या सिनेमाचा विषय अन् कथा कशा प्रकारे मांडली आहे, याला जास्त महत्त्व असते. प्रेक्षक पहिल्या दिवशीच सिनेमा पाहून तो चांगला आहे की नाही याची पावती देतात. या सिनेमाच्या माध्यमातून शान मराठीत पदार्पण करीत आहे. आज आपल्याच संगीत दिग्दर्शकांकडे मराठी सिनेमांना संगीत द्यायला वेळ नाही, तर हिंदीतील संगीतकार मराठीमध्ये येत आहेत. - प्रमोद गोरे, निर्माते
‘रेती’चा धुरळा लवकरच उडणार
By admin | Published: March 31, 2016 2:19 AM