धमाकेदार अॅक्शन दृश्यं असलेल्या हॉलिवूडच्या ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’ (Fast & Furious Franchise) सीरिजचं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना वेड आहे. जगभरात या सीरिजचे कित्येक चाहते आहेत. या सीरिजमधील प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे चाहत्यांचा जीव की प्राण. पण आता प्रेक्षकांच्या एका आवडत्या कलाकाराने या सीरिजमधून बाहेर पडण्याचा निर्णय जगजाहिर घेतला आहे. होय, ‘द रॉक’ नावाने प्रसिद्ध असलेला ड्वेन जॉन्सनने (Dwayne Johnson) या सीरिजमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहिर केला आहे. साहजिकच त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
2011 साली ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस 5’मध्ये मुख्य भूमिका साकारत ड्वेनने या फ्रेन्चाइजीमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. त्याची भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. पण आता या फ्रेन्चाइजीपासून ‘फारकत’ घेत असल्याचं त्याने जाहिर केलं आहे. कारण काय तर विन डिझेलसोबतचं त्याचं कोल्ड वॉर. ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’चा लीड मॅन विन डिझेल व ड्वेन जॉन्सनच्या कोल्ड वॉरच्या बातम्या दीर्घकाळापासून कानावर येत होत्या. पण यावर दोघांनीही मौन बाळगलं होतं. पण आता ड्वेनने आपली चुप्पी तोडली आहे. एका न्यूज पोर्टलसोबत बोलताना, आता मी ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’ सीरिजमध्ये परतण्याची शक्यता मावळली आहे, असे त्यानं स्पष्ट केलं.ड्वेन म्हणाला, ‘मी माझ्या शब्दांवर कायम होतो. माझा नेहमी कलाकारांना पाठींबा असेल. ही फ्रेंचाइजी यशस्वी व्हावी, यासाठी मी प्रार्थना करेल. पण मी या सीरिजमध्ये परतण्याची आता कोणतीही शक्यता नाही.’
काय आहे वाद2016 मध्ये विन डिझेल व ड्वेन जॉन्सन यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून या दोघांचं कधीच जमलं नाही. 2017 मध्ये हा वाद हाणामारीपर्यंत वाढला होता आणि यानंतर ड्वेनने या सीरिजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणामुळे तो ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस 9’मध्ये दिसला नव्हता. ड्वेनने डिझेलच्या प्रोफेशनलिज्मवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र अलीकडे डिझेलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तो जॉन्सनची मनधरणी करताना दिसला होता. ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’च्या आगामी सीरिजमध्ये जॉन्सनने काम करावं, अशी विनंती त्याने केली होती. पण कदाचित डिझेलच्या या पोस्टचा ड्वेनवर काहीही परिणाम झालेला नाही. डिझेलची ही पोस्ट निव्वळ ड्रामा आहे, यापेक्षा काहीही नाही, असं ड्वेन म्हणाला.
ड्वेनने 2011,2013,2015 आणि 2017 मध्ये आलेल्या ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’ फ्रेन्चाइजीमध्ये दमदार अॅक्टिंग केली होती. पण आता ‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’चा 10 व 12 व्या सीझन ‘द रॉक’शिवाय प्रदर्शित होणार आहे.