बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचासूर्यवंशी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिकिटबारीवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमविला आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अक्षय कुमारने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्याने सूर्यवंशीच्या यशाबद्दल आणि करिअरबद्दल सांगितले.
...तर सूर्यवंशीने आणखी जास्त कमाई केली असतीलॉकडाउननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा सूर्यवंशी माझा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी बेलबॉटम हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आताही काही ठिकाणी थिएटर ५० टक्केच खुले आहेत. तर काही ठिकाणी नाइट शोज नाही. पण तरीदेखील हा प्रयत्न करणे गरजेचे होते. जर हा साधारण काळ असता तर सूर्यवंशीने आणखी जास्त कमाई केली असती. पण मी आशा करतो की पुढे प्रदर्शित होणारे 'बंटी और बबली २'सोबत सगळेच चित्रपटांनाही चांगला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळणे गरजेचे आहे. आता आपण सर्वच घरात बसून बसून थकलो आहोत.
स्वतःला नशीबवान समजतो...सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या करिअरमधील हा १५ वा चित्रपट आहे जो १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादासाठी अक्षय कुमारने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की प्रेक्षकांनी मला एवढे प्रेम दिले. कोरोना सारख्या महामारीतून प्रेक्षक चित्रपटगृहात गेले. तिकिट घेतले आणि कुटुंबासोबत सिनेमा पाहणे पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. त्यासाठी मी प्रेक्षकांचे आभार मानतो.
रोहित शेट्टी आहे महत्त्वाकांक्षी दिग्दर्शक मी रोहित शेट्टीला खूप आधीपासून ओळखतो. माझ्या एका चित्रपटावेळी रोहित शेट्टी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तो अत्यंत मेहनती आणि महत्त्वाकांक्षी दिग्दर्शक आहे. प्रत्येक सीनचे तो बारकाईने आकलन करत असतो. चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगाचा खोलवर विचार करणारे फार कमी दिग्दर्शक असतात. त्यातील एक नाव म्हणजे रोहित शेट्टी. जेव्हा मी मोटर सायकलचा स्टंट करत होतो, तेव्हा तोदेखील माझ्यासोबत स्टंट करत होता. त्याला मी कधीच दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेले पाहिले नाही. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हापासून त्याची काम करण्याची जिद्द मी पाहत आलो आहे.
लेखक हा माझ्यासाठी आहे 'स्टार' माझ्या मते चित्रपट त्याच्या कथेवर, पटकथेवरच यशस्वी ठरतो. चित्रपटात 'स्टार पॉवर नाही तर रायटर्स पॉवर' महत्त्वाची आहे. सर्वप्रथम कथा आणि पटकथा लेखक येतात आणि त्यानंतर दिग्दर्शक मग कलाकार. चित्रपटाचे सर्वाधिक श्रेय हे लेखकांना जाते. माझ्या मते लेखक महत्त्वाचा आहे. मी आजवर दीडशेहून अधिक चित्रपटात काम केले आहे. परंतु, जर लेखकांनी हे चित्रपट लिहिलेच नसते तर आज जो अक्षयकुमार आहे तो दिसला असता का? लेखक हा माझ्यासाठी 'स्टार' आहे.
लवकरच दिसणार वेबसीरिजमध्ये ओटीटीची स्वतःची अशी पॉवर आहे. काही चित्रपट आहेत, जे थिएटरमध्ये रिलीज होतात. तर काही चित्रपट ओटीटीसाठीच बनतात. संपूर्ण कोरोना काळात आपण अखेर ओटीटीवर चित्रपट पाहिले आहेत. आता आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे. मी स्वतः एका वेबसीरिजमध्ये काम करतो आहे, ज्याचे शूटिंग पुढील वर्षात सुरू करणार आहे. ती कधी रिलीज होणार हे माहित नाही.
मराठी चित्रपटातही काम करेनमी 'चुंबक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुन्हा एखादी कथा आवडली तर मराठी चित्रपटाची निर्मिती नक्कीच करेन. पण अद्याप मला कोणत्या मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफर आलेली नाही. जर चांगल्या भूमिकेची ऑफर मिळेल तेव्हा नक्कीच मराठी चित्रपटात काम करेन. मी पंजाबी चित्रपटात काम केले. तसेच कन्नड आणि तमीळ सिनेमातही काम केले. आता फक्त भोजपुरी चित्रपटात काम करणे बाकी आहे.
आणखी थिएटर्स सुरू व्हावेतबॉक्स ऑफिसचे आकडे पाहून मी यासाठी प्रभावित होतो. कारण मला त्यातून मोठा चित्रपट बनवण्यासाठी बळ मिळते. मी या सिनेइंडस्ट्रीत आलो आहे तर इथेच मी कमावणार आणि याच इंडस्ट्रीत पैसे लावणार. माझी इच्छा आहे की आणखी थिएटर्स सुरू व्हावेत, चित्रपट आणखी मोठे व्हावेत. ३००-४००च नाह तर ७००-८०० कोटींच्या क्लबमध्ये सामील व्हावेत. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा थिएटर्सची संख्या वाढेल.