Join us

एक एक तारा निखळला..., जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुबोध भावे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 5:05 PM

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सुबोध भावेने इंस्टाग्रामवर जयंत सावरकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जयंत सावरकर यांचे निधन. एक एक तारा निखळला...मी- अण्णा मी एक कार्यक्रम करतोय त्यात मला "एकच प्याला " मधील एक प्रवेश करायचा आहे, मी गडकरींच्या नाटकात कधीच काम केलं नाही.मला ती वाक्य कशी म्हणायची शिकवाल का? अण्णा- का नाही? अर्थात शिकवीन, आनंदाने! असं म्हणुन तुम्ही ठाण्यातून दादर ला येऊन प्रचंड उत्साहात माझी तालिम घेतली होती.संगीत नाटक ते आत्ताच आधुनिक नाटक इतक्या मोठ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार होता. एका तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेनी तुम्ही शेवटपर्यंत कार्यरत होतात. अण्णा तुमच्या बरोबर मला थोडफार काम करता आलं हे माझं भाग्य. अण्णा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

जयंत सावरकर यांनी रंगभूमी आणि दूरचित्रवाणी,चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५पासून चेहऱ्याला रंग लावून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली. ते नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. 

टॅग्स :सुबोध भावे