सायलीने दिवाळीनिमित्त रचलेली ही कविता तिच्याच हस्ताक्षरात.
गप्पांच्या ओघात पुष्करने गाणं गायला आवडतं आणि मी शिकलोयसुद्धा असं सांगितलं. आणि मग काय काहीच वेळात ‘दगड दगडऽऽ..’ हे गाणं गात तिघांनीही आपला दमदार परफॉर्न्सही दिला. अख्ख्या कार्यालयात ‘एलिझाबेथ’ बघाच असं सांगत ‘दगडऽऽ.. दगड’ गात एकच कल्ला करीत उपस्थितांकडून मनमुराद दाद मिळवली.
कार्यालयात आल्यानंतर कम्प्युरवर दिसणारी पेपरची पानं चाळत काय बातम्या लागल्या आहेत याची तिघांची चाचपणी सुरू होती आणि मग संपादकीय विभागातल्या सहकार्यांकडून ते जाणून घेण्यासाठी पळापळ सुरू होती.
या चित्रपटाचे कथानक पंढरपूरमधील आहे. वारीच्या दिवसांमध्ये आपल्या आईला मदत करण्यासाठी एका लहान मुलाने आणि त्याच्या मित्राने केलेला उद्योग अशी चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
चित्रपटाचे कथानक ज्या भागातील आहे त्या पंढरपूरमधीलच मुलांची निवड अभिनयासाठी करण्यात आली. मुख्य म्हणजे ही निवड करताना ‘ऑडिशन’ वगैरे अशा धोपट मार्गाने न जाता जरा वेगळी वाट चोखाळण्यात आली होती.
अनेक चित्रपटांत लहान मुलांच्या तोंडी मोठय़ा माणसांचे विचार - वाक्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या चित्रपटात आम्हाला लहानग्यांचे लहानपण निरागसता त्यांचे छोटेसे विश्व जपल्याचं परेश सांगतो.
चित्रपटादरम्यान परेशदादाला कुणी त्रास दिला कुणी मार खाल्ला या प्रश्नावर या तिघांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. कोणी कोणी किती त्रास दिला याचा १0 मिनिटं खल करण्यात ही तिघं गुंतली होती. शेवटी परेश यांनी सगळ्यात जास्त मार मी खाल्ला म्हणत मुलांना त्यांच्या खलातून मोकळं केलं.
प्रसिद्धीमुळे ‘खेळणं बंद झालंय का तुम्हाला पाहायला गर्दी जमायला लागलीय का..?’ असं विचारताच ‘आम्हाला आता ओळखायला लागलेय पण एवढंही नाही.. तेही बरंच आहे म्हणा नाहीतर डोक्यात हवा जाईल’ असं म्हणत बारा वर्षांच्या पुष्करने ‘कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच हवेत हा विचार’ सहजगत्या उलगडला.
लहान मुलाचं भावविश्व उलगडणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात सुरू आहे. या चित्रपटातील पुष्कर लोणारकर श्रीरंग महाजन आणि सायली भंडारकर-कवठेकर या ‘छोट्या’ कलाकारांनी परेश मोकाशीसह ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयाला भेट देत धम्माल मजा मस्ती आणि दंगा करत लोकमतला आपलसं केलं.