बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 'मर्डर' हाच सिनेमा येतो. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये इमरानने मल्लिका शेरावतसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. इतकंच नाही तर इमरानने अनेक अभिनेत्रींसोबत किसिंग सीन दिले आहेत. त्यामुळे त्याला सिरीअल किसर असंही म्हटलं जातं. इमरा कलाविश्वात चांगलाच सक्रीय आहे. अलिकडेच तो सलमान खानच्या 'टायगर 3' या सिनेमात झळकला होता. त्यामुळे इंडस्ट्रीत त्याचा दांडगा वावर असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, इमरान इंडस्ट्रीत होणाऱ्या पार्ट्या किंवा पुरस्कार सोहळ्यांना जाण्याचं कायम टाळतो. यामागचं कारण त्याने नुकतंच सांगितलं आहे.
इमरानने 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या फिल्मी करिअरविषयी भाष्य केलं. यामध्येच त्याने तो बॉलिवूड पार्ट्यांना हजेरी का लावत नाही या मागचं कारणंही सांगितलं. तू कोणत्याही पुरस्कार सोहळा किंवा पार्टीमध्ये दिसत नाही. वा कलाकारांच्या ग्रुपमध्येही दिसत नाहीस असं का? असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला होता. यावर, उत्तर देत त्याने वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायला आवडतं असं सांगितलं.
''मी व्यावसायिक आणि खासगी आयुष्य वेगळं ठेवतो. अभिनेता म्हणून मी अभिनय करण्याचं काम करतो. पण, त्यानंतर मी माझं वैयक्तिक आयुष्यात जास्त रमतो. मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून मी हा फॉर्म्युला वापरत आहे", असं इमरान म्हणाला.
दरम्यान, फूटपाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इमरानने आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अलिकडेच तो टायगर ३ मध्ये झळकला होता. या सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. अलिकडेच तो शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टीला गेला होता. मात्र, ही पार्टी अर्ध्यावर सोडून त्याने काढता पाय घेतला त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये त्याच्या गैरहजेरीचा मुद्दा चर्चिला जात आहे.