Join us

‘निर्माता म्हणून मराठीत काम करायला मजा येते’

By admin | Published: June 04, 2017 3:45 AM

‘तुझे मेरी कसम’ या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास १४ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने ‘क्या कूल है हम’, ‘अपना सपना

- Geetanjali Ambre‘तुझे मेरी कसम’ या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास १४ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने ‘क्या कूल है हम’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘नमस्ते लंडन’, ‘हाऊसफुल्ल’ सारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेविषयी त्याच्याशी मारलेल्या या खास गप्पा... आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तू तुझ्या मित्रांच्या साथीने चोरी करताना दिसतो आहेस याबद्दल काय सांगशील?- हा एक इंटरेस्टिंग चित्रपट आहे. बँकेत चोरी होणे ही एक गंभीर गोष्ट आहे. तीन लोक ज्यांनी कधीच बँक लुटली नाही, ज्यांना याबाबत काहीही माहिती नाही पण परिस्थीतीमुळे ते बँक लुटायला जातात. या तिघांचे एकमेकांसोबत अजिबात पटत नाही. बँकेत चोर शिरल्याची गोष्ट लगेच बाहेर येते. त्यामुळे याठिकाणी पोलीस येतात, मीडिया येते, बाहेर लोक जमा होतात, सीबीआय आॅफिसर येतो. ज्या लोकांनी बँकेत बरंच काही लपवले असते त्यांना वाटत आता आपले काय काय बाहेर पडणार आहे. मात्र, आतल्या तिघांना बाहेर काय घडत आहे याबद्दल काहीच माहिती नसते. अशा परिस्थितीत जे विनोद घडतात तेच आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तू चित्रपट स्वीकारताना कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतोस ?- स्क्रिप्टला. कधी कधी दिग्दर्शकला स्क्रिप्ट स्वत:च सांगायची असते मी ती ऐकतो. त्यानंतर मात्र मी स्वत: देखील स्क्रिप्ट वाचतो आणि त्यानंतर मी निर्णय घेतो. कधी कधी जर स्क्रिप्ट आवडली तर एका आठवड्यानंतर मी पुन्हा वाचतो आणि मग ती स्क्रिप्ट मला खरंच आवडली आहे का, याचा विचार करून निर्णय घेतो. एखादी भूमिका स्वीकारताना तू जेनिलियाशी चर्चा करतोस का ?- एखादी भूमिका करण्याचा माझा निर्णय झाला की, ती स्क्रिप्ट मी जेनिलियाला वाचायला देतो. ती स्क्रिप्ट वाचते आणि मग तिला त्या भूमिकेविषयी तिला काय वाटतं, याबाबत माझ्याशी चर्चा करते. तिला स्क्रिप्ट वाचून चित्रपट किती इंटरेस्टिंग वाटला, हे ती मला सांगते. यापूर्वीही तू विवेकसोबत अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेस. त्यामुळे तुमची सेटवर केमिस्ट्री कशी असते ?- गेल्या दहा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. हा आम्ही एकत्र काम करत असलेला चौथा चित्रपट आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आमच्यात एक कम्फर्ट लेव्हल आहे आणि या कम्फर्ट लेव्हलमुळे बऱ्याचशा गोष्टी करणे सोपे जाते. एकमेकांना आम्ही भूमिका अधिक चांगली होण्यासाठी सेटवर सल्लाही देत असतो. त्यात कोणताही स्वार्थ नसतो. तू मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहेस, या भूमिकेकडे तू कसा बघतोस ?- या चित्रपटाचा मी निर्माता आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मी सध्या काम करतो आहे. ती स्क्रिप्ट जवळपास मी लॉक केली आहे. सध्या प्री प्रोडक्शनवर काम चालू आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या की, मग भूमिका कशी साकारायची याबाबत आम्ही विचार करू. शिवाजी महाराज या तुझ्या चित्रपटाकडे मराठीतील सगळ्यात बिग बजेट चित्रपट म्हणून बघितले जाते याबद्दल काय सांगशील?- हा विषय फार मोठा आहे. अशा एका मोठ्या व्यक्तीवर आपण चित्रपट तयार करतो आहे, जे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे काम. विषयाची त्यांची मांडणी असेल, त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी त्याच मापदंडावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला प्री प्रोडक्शनला कळेल की, या चित्रपटाचे काय बजेट असेल किंवा असावे आणि माझ्या प्रोडक्शनमधला तरी हा सगळ्यात बिग बजेट चित्रपट असेल. तू हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत काम केले आहेस. दोन्हींमध्ये तुला काय फरक जाणवला ?- मला असे वाटते, असे मराठी बरेच विषय आहेत जे तुम्ही हिंदीत करू शकत नाही. मी ‘बालक पालक’ हा चित्रपट मराठीत तायर केला होता. मात्र, जर तोच चित्रपट मला हिंदीत करायचा असेल तर त्यासाठी मला विचार करावा लागेल. प्रेक्षक नव्या चेहऱ्यांना स्वीकारतील? हा चित्रपट पाहायला जातील का? असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे निर्माता म्हणून मराठीत प्रोडक्शनमध्ये काम करायला मजा येते.