कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका स्टार प्लसवर प्रक्षेपित होत असून मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी चिमुकली आकृती शर्मा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याच आकृतीने तिच्यासोबत अलीकडेच घडलेला एक किस्सा नुकताच सांगितला. एके दिवशी तिला तिची सारी शाळाच तिच्या वर्गाबाहेर जमा झालेली दिसली आणि त्या सर्वांना तिची स्वाक्षरी हवी होती, असे तिने सांगितले.
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेमुळे आकृतीचे नाव आता घरोघरी पोहोचले असून असंख्य प्रेक्षक तिच्याबरोबरच गातात आणि आपला आनंदही तिच्याबरोबरच व्यक्त करतात. आता कथानक जसे पुढे सरकेल, तसे कुल्फीचे दु:खाचे दिवस संपतील; कारण तिला तिच्या खऱ्या पित्याची ओळख पटेल. कुल्फी सध्या या मालिकेचे चित्रीकरण आणि शाळेतील परीक्षा यांचे वेळापत्रक सांभाळण्याची कसरत करत आहे. आपल्या शाळेत अलीकडेच घडलेल्या एका प्रसंगाबाबत बोलताना आकृती सांगते, “काही आठवड्यांपूर्वी जेव्हा मी शाळेत गेले होते, तेव्हा संपूर्ण शाळा माझ्या वर्गाबाहेर गोळा झाली होती. त्या सर्वांना माझ्याबरोबर फोटो काढायचे होते आणि त्यांना माझी स्वाक्षरी हवी होती. त्यांचं माझ्यावरील हे प्रेम पाहून मी फार भारावून गेले होते. तरी मी प्रत्येकाला भेटले. मी प्रथमच माझ्या मित्र-मैत्रिणींना माझी स्वाक्षरी दिली आणि तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं की ते सर्वजण माझी मालिका पाहतात आणि त्यांना माझी भूमिका फार आवडते. आता माझी परीक्षा संपल्यावर मी माझ्या काही मित्र-मैत्रिणींना चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर नेणार असून त्यांच्याबरोबर संपूर्ण दिवस घालविणार आहे.”
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळत आहे.