मनोरंजनसृष्टीत अनेकांचं एकमेकांशी नाव जोडलं गेलं आहे. अनेकांचे अफेअर्स चर्चेत आहेत. ईशा देओल (Esha Deol) आणि अजय देवगणच्याही (Ajay Devgn) रिलेशनशिपची एकेकाळी चर्चा उठली होती. दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. ईशा देओल आता १४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. विक्रम भट यांच्या 'तुमको मेरी कसम' सिनेमात ती दिसणार आहे. ईशाने सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने एका मुलाखतीत अजय देवगणसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं.
'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, "माझं तर अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं होतं. काही वेळेस ते खरंही होतं काही गोष्टी खोट्या होत्या. अजय देवगणसोबत माझ्या नावाची चर्चा झाली. पण अजयसोबत माझं नातं केवळ आदराचं राहिलं आहे. आमचा खूप छान आणि वेगळा बाँड होता. प्रेम, आदराने परिपूर्ण असं आमचं नातं होतं."
अफवांची कारणं काय यावर ईशा म्हणाली, "मला वाटतं तेव्हा मी आणि अजय बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र दिसत होतो. त्यामुळे कदाचित आमच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यात काहीही तथ्य नव्हतं."
ईशा देओल आणि अजय देवगण यांनी 'युवा','एल ओ सी कारगिल','इंसान','काल' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. ईशाचा गेल्या वर्षी भरत तख्तानीसोबत घटस्फोट झाला. त्यांनी १२ वर्षांचा संसार मोडला. त्यांना दोन मुली आहेत. ईशाने आता बऱ्याच वर्षांनी सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. 'तुमको मेरी कसम' हा सिनेमा उद्या रिलीज होत आहे. यामध्ये अदा शर्मा, अनुपम खेर यांचीही भूमिका आहे.