१९९१ साली माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी साधारण होती. या चित्रपटात अलका कुबल यांनी सूनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’, ‘माझं छकुल छकुल’ ही गाणीदेखील खूप हिट झाली होती. आता या चित्रपटाला रिलीज होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा चित्रपट आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत.
अलका कुबल यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर माहेरची साडी चित्रपटाला ३० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटातील काही फोटो शेअर करत लिहिले की, ३० वर्षे माहेरची साडीचे. अवघ्या मराठी माता भगिनींच्या हृदयात हक्काचे स्थान मिळवलेला "माहेरची साडी" हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज तीन दशके झाली.या काळात अवघ्या मराठी माणसांनी "आपली ताई" म्हणून मला सन्मान दिला. माझे कोडकौतुक केले. आजही "माहेरची साडी" विस्मरणात गेलेली नाही. त्याबद्दल मी तमाम मराठी रसिकांची मनापासून आभारी आहे. असंच उदंड प्रेम यापुढेही मिळावे, हीच अपेक्षा.