सोनी सब वाहिनीवर पुण्याच्या पार्श्वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये भाकरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद यात पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत.
या मालिकेबद्दल देवेन भोजानी म्हणाला की, 'या मालिकेत एक मराठी कुटुंब आहे आणि दुसरे गुजराती कुटुंब आहे. हे दोघेही एकाच परिसरात भाकरवडीचा व्यवसाय करतात आणि त्यामुळे या शोचे नाव भाकरवडी असे आहे. दोन्ही कुटुंबप्रमुख एकमेकांचे स्पर्धक होतात आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात. ही मालिका ज्या पद्धतीने बनवण्यात आला आहे त्याबद्दल मला खूप आनंद होतो, कारण त्यातील व्यक्तिरेखासुंदर आहेत, त्यांच्यातील आंतरवैयक्तिक संबंध आणि तपशीलही खूप छान आहेत. मला वाटते की प्रेक्षकांना हा शो, त्याची संकल्पना, व्यक्तिरेखा, त्यात दाखवण्यात आलेले नातेसंबंध, विनोद, नाट्य, भावना व सर्वांत महत्त्वाचे या शोचे नावीन्य हे सर्व आवडेल.'देवेनने या मालिकेत अण्णाची भूमिका साकारली असून अण्णा या कथेतील नायक आहे आणि तो अत्यंत तत्ववादी माणूस आहे. अण्णा भाखरवडीचा व्यवसाय करतो आणि तो नर्मविनोदीही आहे. तो अभिमानी महाराष्ट्रीय माणूस आहे ज्याला भाकरवडीऐवजी ग्राहकाने बाकरवडी असे म्हटले तरी राग येतो, असे त्याने सांगितले.'भाकरवडी' मालिका ११ फेब्रुवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.