कौन बनेगा करोडपतीच्या अकराव्या सीझनचा दुसरा करोडपती मिळाला असून अमरावतीतील बबिता ताडे यांनी या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकले आहेत. बबिता ताडे अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी बनवण्याचं काम करतात. बबिता ताडे आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर थेट मुंबई गाठत 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी झाल्या. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकून त्या करोडपती झाल्या आहेत.
कौन बनेगा करोडपती शोमध्ये एक करोड रुपये जिंकलेल्या बबिता ताडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, माझे शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झाले असून मला एमपीएससी परीक्षा द्यायची होती. पण मला लग्न, मुलं या सगळ्यात हे जमले नाही. मला नेहमीच वाचनाची आवड आहे. मी न चुकता वर्तमानपत्रं वाचते. मी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनलादेखील रजिस्ट्रेशन केले होते. पण गेल्या सिझनला मला या कार्यक्रमाचा भाग होता आले नाही. पण या सिझनला मी या कार्यक्रमाचा भाग बनले. फास्टेस्ट फिंगर फर्स्टपासून हॉट सीटपर्यंतचा माझा प्रवास खूपच कठीण होता. कारण मला कॉम्प्युटर हाताळता येत नाही. त्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. आज माझे अनेक वर्षांपासूनचे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा भाग बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
बबिता त्यांनी जिंकलेल्या एक करोड रुपयांचे काय करणार असे विचारले असता त्या सांगतात, मी अजिबातच वायफळ खर्च करणार नाही. मला मिळालेला पैसा मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे.
मी गेल्या अनेक वर्षांपासून एका शाळेत खिचडी बनवण्याचे काम करते. त्यासाठी मला केवळ 1500 रुपये मिळतात तर त्याच शाळेत माझे पती शिपाई आहेत. त्यांना देखील खूपच कमी पगार आहे. पण तरीही आम्हाला मिळणाऱ्या पैशांतून आम्ही आजवर मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. यापुढे देखील त्यांच्या शिक्षणालाच आम्ही प्राधान्य देणार आहोत.