ललित प्रभाकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता. हंपी,आनंदी गोपाळ या सिनेमातील त्याच्या अफलातून भूमिकांमुळे तो अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला. लवकरच ललित प्रभाकरची अत्यंत वेगळी भूमिका असणारा स्माईल प्लीज हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं वैशिष्ठय म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीसचा हृदयांतर या सिनेमानंतर दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा. या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना अनेक धमाल किस्से घडले आहेत. या सिनेमातील गणपती मिरवणुकीतील चित्रीकरणाचे काही एक्सक्लुझिव्ह फोटो लोकमतच्या हाती आले आहेत.
विक्रम फडणीसने ललितचे काम याआधी पाहिले होते आणि तेव्हाच असे ठरवले होते, की माझ्या पुढच्या चित्रपटात ललित असणार आणि विक्रम फडणीस यांनी त्यांचा शब्द पाळला. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणारा, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारा आणि व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असणाऱ्या तरुणाची भूमिका ललित ''स्माईल प्लीज' या चित्रपटात साकारत आहे. 'आनंदी गोपाळ' या चित्रपटामध्ये साकारलेल्या कणखर, कडक, शिस्तप्रिय अशा गोपाळरावांच्या भूमिकेच्या एकदम विरुद्ध अशी भूमिका ललित 'स्माईल प्लीज' या चित्रपटात साकारत आहे. या निमित्ताने ललितला तो खऱ्या आयुष्यात जसा आहे, तशीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
चित्रीकरणादरम्यान ललित सिनेमाच्या सेटवर खूप धमाल, मजा, मस्ती करायचा. त्यातलाच एक किस्सा म्हणजे 'स्माईल प्लिज' चित्रपटात गणपती मिरवणुकीचा एक सीन आहे. सीन संपल्यावर, दिग्दर्शकाने ओके दिल्यानंतर ललित त्या मिरवणुकीत सामील झाला आणि मनसोक्त नाचला. यात तो एकटाच नाचला नाही तर त्याने सेटवरील सहकलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह सगळ्यांनाच नाचण्यास भाग पाडले आणि सेटवरील संपूर्ण वातावरणच बदलून गेले. त्यामुळे सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित होऊन नव्या जोमाने परत सर्व कामाला लागले.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.