Join us

EXCLUSIVE : 'मराठी सिनेमा मागासलेला कधीच नव्हता'; सुबोध भावेनं मांडलं आपलं मत, म्हणाला - 'प्रत्येकाने...'

By तेजल गावडे | Published: June 20, 2023 6:20 PM

Subodh Bhave : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे' या अत्यंत गाजलेल्या शोच्या दुसऱ्या सीझनसह बिग एफएमवर पुन्हा हजर झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे' (Big Marathi Bioscope With Subodh Bhave) या अत्यंत गाजलेल्या शोच्या दुसऱ्या सीझनसह बिग एफएमवर पुन्हा हजर झाला आहे. या शोमध्ये अभिनेता केवळ मराठी चित्रपटांच्या अज्ञातकथा केवळ सांगणारच नाही तर या कथांबद्दलची आपली मतेही मांडणार आहे. या शोच्या निमित्ताने सुबोध भावेसोबत केलेली ही बातचीत. 

'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे'च्या दुसऱ्या सीझनबद्दल...गेल्या सीझनमध्ये दर आठवड्याला वेगळेपण जपलं नव्हतं. त्यावेळी मराठी सिनेमांविषयी आणि त्यातल्या वेगवेगळ्या घटनांविषयी बोलत होतो. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये दर आठवड्याला वेगळी थीम आहे. पहिल्या आठवड्याची थीम होती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट, दुसऱ्या आठवड्यात ऐतिहासिक चित्रपट असे प्रत्येक आठवड्याला थीम बदलत जाईल. त्या विषयाअंतर्गत येणाऱ्या चित्रपटांविषयी, कलाकारांबद्दल आपण माहिती देऊ. दर आठवड्याला शोमध्ये या चित्रपटांमध्ये काम केलेला कलाकार गेस्ट म्हणून येणार आहेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. काही प्रश्न आपण लोकांना विचारणार आहोत. त्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या व्यक्तीला छान भेटवस्तूदेखील आपण देणार आहोत. त्यामुळे मागील सीझनपेक्षा दुसरा सीझन जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. किस्से, कहाण्या आणि घटना आहेतच पण त्याची विभागणी दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांनुसार केल्याचे यावेळी सुबोधने सांगितले. 

मराठी सिनेमा कधीच मागासलेला नव्हतामराठी सिनेमांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल बोलताना सुबोध म्हणाला की, मराठी सिनेमा मागासलेला कधीच नव्हता. तो जेव्हा सुरू झाला तेव्हाच खरा तो सर्वात जास्त प्रोगेसिव्ह सिनेमा होता. ज्या काळात सिनेमा सुरू झाला त्या काळात इथे काम करणाऱ्या प्रत्येकाने विलक्षण प्रयोग त्याच्यामध्ये केले म्हणून आज आपण हे दिवस बघतोय. त्यामुळे प्रगती केलीय असं मी म्हणणार नाही. अजून जास्त प्रगती व्हायला हवी, अशी माझी इच्छा आहे. जिथे आपण सुरूवात केली त्याच्यापेक्षा १०० वर्षांनंतर आपण जास्त पुढे जायला पाहिजे. सिनेमा माध्यमाचा विचार करुन गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत सुद्धा, लोकांच्या आवडीनिवडीत सुद्धा. तर मला असे वाटते ती प्रगती थांबलीय का ? तर ती थांबलेली नाहीये. ज्या वेगाने ती सुरू व्हायला पाहिजे किंवा ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे त्या वेगाने ती जात नाही आहे. त्यामुळे जिथे सिनेमाची सुरूवात झाली तेव्हा ३०-४० वर्षातला प्रगतीशील सिनेमा होता. आता ती प्रगती खऱ्या अर्थाने १०० वर्षांनंतर सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी अशाप्रकारचा कार्यक्रम गरजेचा आहे. पुन्हा एकदा सिंहवलोकन आपल्या लोकांनी केलेलं काम आपल्या नजरेसमोर येतं आणि आपल्याला काय केले पाहिजे आणि आपण कुठे कमी पडतोय, या सगळ्याचा सारासार विचार करुन आपण त्याच्यावर काम करुन पुढे जायला पाहिजे. 

मालिकेत कमबॅक कधी?तुला पाहते रे मालिकेनंतर पुन्हा मालिकेत कधी काम करताना कधी दिसणार, या प्रश्नावर सुबोधने सांगितले की, सध्या तरी मालिकेत काम करण्याचा विचार केलेला नाही.

सिनेइंडस्ट्रीतला महत्त्वाचा क्षण...जेव्हा मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला, तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सगळ्याच सिनेमांनी मला खूप आनंद दिला आहे आणि भरपूर शिकवलेदेखील आहे. त्यामुळे मी कोणत्या एखाद्या सिनेमाचं नाव सांगू शकत नाही. हा स्पेशल आहे. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले तो क्षण स्पेशल आहे. कारण अनुभवाचं समृद्ध दालन उघडून दिलं. ज्याच्यामध्ये मी २२ वर्षे आनंदाने काम करतो आहे आणि पुढेही करत राहीन. त्यामुळे ज्या क्षणी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तो क्षण महत्त्वाचा असल्याचे सुबोधने सांगितले.सुबोध भावेकडे आगामी बरेच प्रोजेक्ट आहेत. मात्र आता त्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही, असे तो म्हणाला.        

टॅग्स :सुबोध भावे