सध्या महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना (Corona Virus) रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र तरीही कोरोना निर्बंधांमुळे अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम होतो. पन्नास टक्के चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतची नाराजी नुकतीच चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम सागर कारंडे (Sagar Karande) याने 'लोकमत'कडे व्यक्त केली.
सागर कारंडे 'लोकमत'शी बोलताना म्हणाला की, कोरोनामुळे नाट्यगृहात फक्त पन्नास टक्केच प्रेक्षकांच्या उपस्थितींचे बंधन आहे, त्याबद्दल थोडीशी माझी नाराजी आहे. कारण इतर ठिकाणी कुठेच पन्नास टक्के लोकांना परवानगी नाही आहे. मग ते रेस्टॉरंट असतील किंवा बस वा ट्रेन. मग फक्त नाट्यगृहांमध्येच का पन्नास टक्के लोकांना परवानगी आहे. नियमांचे बंधन फक्त नाट्यगृहांनाच का, रात्रीचा प्रयोग ८ वाजता असतो आणि तो १० किंवा १०.३०-११ ला संपतो. बाकीच्या गोष्टी रात्री १० नंतरही सुरू असतात. मग हे सर्व नियम नाट्यगृहांनाच का, असा सवालही यावेळी त्याने उपस्थित केला.
सागर कारंडे सध्या 'चला हवा येऊ द्या' या शो व्यतिरिक्त 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' आणि 'इशारो इशारो में' या नाटकात काम करतो आहे. नाटकांच्या प्रयोगांमुळे त्याने चला हवा येऊ द्या हा शो सोडल्याची चर्चा होती. मात्र त्याने नाटकांचे प्रयोग आणि चला हवा येऊ द्या शोच्या शूटिंगच्या तारखा सांभाळून सध्या काम करत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मला नाटकांचे फार वेड आहे. त्यामुळे मला नाटकात काम करायला फार आवडते. शनिवार-रविवारी कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेण्यापेक्षा मला नाटकांचे प्रयोग करायला जास्त आवडेल. चांगल्या नाटकात काम करण्याची संधी आली तर मी ती अजिबात सोडत नाही. लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांच्यासोबत याआधी मी बरेच काम केले आहे. जवळपास पाच-सहा नाटकांसाठी मी काम केले आहे. जर ओळखीचे दिग्दर्शक आहेत आणि नाटक उत्तम लिहिण्यात आले आहे. तसेच ते उत्तम बसवण्यातही आले आहे. त्यामुळे मी नाटकांचे प्रयोग आणि चला हवा येऊ द्या शोच्या शूटिंगच्या तारखा सांभाळून सध्या काम करतो आहे.