छोट्या पडद्यावरील मालिकांच्या लोकप्रियतेमध्ये त्या त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं मोठं योगदान असतं. या मालिकेतील हे कलाकार प्रत्येक घराघरात जणू काही कुटुंबाचे सदस्य बनतात. त्यामुळे मालिकेत घडणाऱ्या अनेक गोष्टी रसिक जणू ते त्यांच्या आयुष्यात घडतायत असे समजून ते बदल स्वीकारतात आणि नाकारतातसुद्धा. त्यातच या मालिकांमधील एखादं प्रमुख पात्र साकारणाऱ्या कलाकाराची एक्झिट झाली की रसिकांचा हिरमोड होतो. त्याचा फटका या मालिकांच्या टीआरपीला बसतो. हेच आजवरील मालिकांमधील प्रमुख कलाकारांच्या एक्झिटनंतर पाहायला मिळालंय. पाहूया कोण आहेत असे बडे कलाकार ज्यांच्या एक्झिटमुळं त्या मालिकेच्या टीआरपीला धक्का लागला.नैतिक (करण मेहरा) ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या स्टार प्लसवरील मालिकेतील नैतिक घराघरात लोकप्रिय ठरला होता. नैतिक अर्थात करणनं अल्पावधीत आपल्या भूमिकेनं रसिकांची मनं जिंकली होती. गेल्या सात वर्षांपासून या मालिकेत काम करणाऱ्या करणनं अचानक या शोमधून एक्झिट घेतलीय. बिघडणाऱ्या तब्येतीमुळे त्यानं मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याला डोकेदुखीच्या विचित्र त्रासानं ग्रासलंय. त्यामुळे इच्छा नसतानाही शो सोडावा लागत असल्याचं त्यानं म्हटलंय. याचा परिणाम आगामी काळात या मालिकेच्या टीआरपीवर होण्याची भीती व्यक्त केली जातेय. आनंदी (प्रत्युषा बॅनर्जी) बालिका वधू ही छोट्या पडद्यावरील मालिका सुरुवातीपासून रसिकांमध्ये लोकप्रिय ठरली. बालपणीची आनंदी तर घराघरात भावली होती. त्यानंतर मोठी झालेली आनंदी कशी असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आनंदीच्या भूमिकेला पूर्ण न्याय देत रसिकांचा विश्वास मिळवला. अल्पावधीतच आनंदी म्हणून प्रत्युषा घराघरातून रसिकांच्या मनात पोहोचली. बालिका वधू लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मात्र अचानक कुठे तरी माशी शिंकली. काही वादामुळे प्रत्युषाला मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली. मात्र प्रत्युषाची एक्झिट रसिकांना तितकीशी काही रुचली नाही. त्यामुळे काही दिवसांतच बालिका वधू मालिकेचा टीआरपी घसरल्याचं दिसून आलं.मिहीर (अमर उपाध्याय) ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. यातील तुलसी आणि मिहीरची जोडी रसिकांना भावली होती. तुलसी आणि मिहीरनं अल्पावधीतच रसिकांच्या घराघरात आणि मनामनात स्थान मिळवलं. मात्र काही कारणास्तव मिहीरची भूमिका साकारणाऱ्या अमर उपाध्यायनं ही मालिका सोडली. मिहीरच्या एक्झिटनंतर रसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली... ही जोडी कायम दिसत राहावी असं मत अनेकांनी व्यक्त केलं. परिणामी काही दिवसांतच या मालिकेचा टीआरपी घसरत गेल्याचं पाहायला मिळालं.गोपी (जिया मानेक) ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहू छोट्या पडद्यावरील रसिकांमध्ये हिट ठरली. आदर्श बहू कशी असावी असे दाखले गोपी बहूला पाहून देऊ जाऊ लागले. मात्र दुसऱ्या एका वाहिनीवरील डान्स रिअॅलिटी शोमध्ये जियानं सहभाग घेतल्यानं तिची ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून एक्झिट झाली. मात्र जियाच्या एक्झिटनंतर दुसऱ्या अभिनेत्रीला गोपी म्हणून स्वीकारणं रसिकांसाठी कठीण गेलं. त्यामुळं काही दिवसांत या मालिकेचा टीआरपीसुद्धा पडला.गुत्थी (सुनील ग्रोव्हर) छोट्या पडद्यावरील डेली सोप अर्थात मालिकांमधील चेहरेच रसिकांच्या घराघरात पोहोचतात असं नाही. स्टँड-अप कॉमेडीयनसुद्धा रसिकांचे फेव्हरेट आहेत. कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा या शोच्या निमित्ताने ही प्रचिती आली. या शोमधील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. त्यांनी रसिकांना खळखळून हसवलं. यातील सुनील ग्रोव्हरनं साकारलेली गुत्थी तर रसिकांना चांगलीच भावली. तिचा अंदाज, तिची कॉमेडी रसिकांची दाद मिळवून गेली. मात्र काही कारणांमुळे कपिलशी झालेल्या वादानंतर गुत्थी अर्थात सुनील ग्रोव्हरनं कपिलच्या शोमधून एक्झिट घेतली. मात्र गुत्थीची एक्झिट रसिकांना रुचली नाही. याबाबत सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून नाराजी व्यक्त झाली. गुत्थीच्या एक्झिटचा कपिलच्या शोच्या टीआरपीवरही परिणाम झाला. त्यामुळेच की काय अखेर गुत्थीचं कपिलच्या शोमध्ये पुनरागमन झालं.- suvarna.jain@lokmat.com
प्रमुख स्टारची एक्झिट... टीआरपी गडगडला!
By admin | Published: June 15, 2016 3:09 AM