- अनुज अलंकार
हिंदी चित्रपट : ब्लू बेरी हंट केरळचे दिग्दर्शक अनुप कुरियन यांचा ब्लू बेरी हंट हा चांगल्या कथाबीजावर बनलेला एक कमकुवत चित्रपट आहे. केवळ चित्रपट महोत्सवात दाखविण्यासाठीच तो तयार करण्यात आला आहे, असे वाटते. मल्याळमपासून तामिळ, हिंदी आणि मराठी संवादांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात हिंदी प्रेक्षकांसाठी नसिरुद्दीन शाह हे एकमेव आकर्षण आहे. चित्रपटाची कथा केरळच्या जंगलाभोवती फिरते. कर्नल (नसिरुद्दीन शाह) याच जंगलात राहतो. कर्नल जंगलात एक पीक घेत असतो. त्यावर अनेकांचा डोळा असतो. ते कर्नलला ठार मारून पीक हडपू पाहत असतात. कर्नलला चोहीकडून धोका असतो. मात्र, त्याच्याकडे सीसीटीव्हीसह अनेक अत्याधुनिक साधने असतात व त्याद्वारे तो त्याच्या शत्रूंवर लक्ष ठेवत असतो. त्याचे पीक खरेदी करणारा बिहारचा व्यावसायिक एकदा आपल्याबरोबर एका मुलीला आणतो आणि काही दिवसांसाठी तिला कर्नलकडे सोडतो. ही मुलगी (आहना कुमरा) सुरुवातीला कर्नलला घाबरते. मात्र, नंतर त्याला साथ देऊ लागते. या मुलीचे संरक्षण करताना कर्नल आधी आपल्या पाळीव प्राण्याची आहुती देतो आणि नंतर आपल्या प्राणाचीही बाजी लावतो.उणिवा : हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना अशा प्रकारचे प्रायोगिक चित्रपट रुचत नाहीत याची कदाचित चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप कुरियन यांना जाणीव नसावी. गतीचा अभाव ही या चित्रपटाची सर्वांत मोठी उणीव आहे. लागोपाठच्या लांबलचक अनावश्यक दृश्यांमुळे चित्रपट रटाळ होतो. त्यामुळेच चित्रपटाचे संपादन कमकुवत वाटते. चित्रपटात इतरही काही मोठ्या उणिवा आहेत. सर्वांपासून लपून जंगलात राहणारा कर्नल विजेचा कसा वापर करतो हे कोणाला कळत नाही. त्याला जंगलात विजेची जोडणी कोणी दिली असेल, असा प्रश्न कोणालाही पडेल. एका दृश्यात तो शहरवासीयांना घाबरत असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर दुसऱ्या दृश्यात तो जवळच्या एका शहरात धूम स्टाईलने दुचाकी चालवताना दिसून येतो.वैशिष्ट्ये : नसिरुद्दीन यांनी पुन्हा एकदा सर्वांगसुंदर अभिनय केला आहे. आहना कुमरा सुंदर दिसते, अभिनय चांगला व्हावा यासाठी तिने परिश्रमही घेतले आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण सुंदर आहे. चित्रपटात अनेक रोमांचक दृश्ये आहेत.का पाहावा?स्वत:च्या जोखमीवर पाहावा; कारण हा प्रायोगिक चित्रपट आहे, त्यात मसाले नाहीत. चित्रपट का पाहू नये?पाहणाऱ्यांना काही समजणार नाही. एकंदरित या शैलीत बनलेले चित्रपट आवडणारा वर्ग फार मोठा नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या यशाची शक्यता नसल्यात जमा आहे.