सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणाऱ्या फेसबुकच्या (Facebook) नावात बदल करण्यात आला आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ (Meta) या नव्या नावाने ओळखली जाईल. गेल्या काही दिवसांपासून, फेसबुक री-ब्रँडिंग करणार असल्याची चर्चा होती. या चर्चांमध्येच आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात नाव बदलत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण व्यक्त होत आहे. यामध्येच प्रसिद्ध मराठी लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे व्यक्त झाले आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या केदार शिंदे यांनी नुकतंच फेसबुकसंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी फेसबुकच्या बदलण्यात आलेल्या नावाची फिरकी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ट्विट केलं आहे. ते पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
"आता जीव अधिक "मेटा"कुटीला येणार",असं म्हणत केदार शिंदे यांनी ट्विट केलं आहे.सोबतच त्यांनी #Facebook #Facebooknewname #MarkZuckerberg हे हॅशटॅग्सही वापरले आहेत.
दरम्यान, केदार शिंदे सोशल मीडियावर कायम उघडपणे व्यक्त होत असतात. अलिकडेच त्यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे. तर फेसबुकने नावात बदल केल्यानंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रॉडक्ट आहे.