ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नुकतेच आले आहे. पण आता त्यानंतर एका वेगळ्याच चर्चेला ऊत आले आहे. सोशल नेटवर्किंगवर सध्या कनिकाचा प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला असून कनिका लंडनमध्ये असताना त्यांना भेटली होती अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
प्रिन्स चार्ल्स आणि कनिका यांची काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भेट झाली असल्याचे वृत्त चुकीचे असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो आताचा नसून 2015 मधील आहे. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, चॅरिटीसाठी 2015 मध्ये एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. हा फोटो त्याच इव्हेंटमधील आहे.
कनिका कपूरचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट कनिकाचेच आहेत का असा प्रश्न तिच्या घरातल्यांना पडला होता. कारण या रिपोर्टमध्ये मुलगीऐवजी मुलगा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे तिची कोरोनाची चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली होती. या चाचणीत देखील तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते.
कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.
तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की, मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.