Swara Bhasker Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गुपचूप लग्नबंधनात अडकली. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी स्वराने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. खरं तर लग्न ६ जानेवारीलाच झालं. पण काल १६ फेब्रुवारीला तिने याबद्दलची माहिती दिली. आता स्वरा व फहाद पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. आता स्वराचा पती फहादने स्वरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खास आहेच, पण त्यापेक्षा खास आहे या फोटोला फहादने दिलेलं कॅप्शन.
फहादने लिहिलं...
“जेव्हा तुम्हाला कळतं की अखेर ते झालं आहे... तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. खरं तर ही सगळी प्रक्रिया व्याकुळ करणारी लागली होती. पण त्याचे परिणाम तुम्हाला आता आमच्या चेहऱ्यावरून वाचता येतील. जेव्हा मी स्वराला कोर्टात नाचण्यापासून रोखण्यात अयशस्वी झालो, तेव्हा मीही तिच्याबरोबर नाचू लागलो. माझ्या मते, सुखी वैवाहिक जीवनाचं हेच रहस्य आहे...,” असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
स्वरा व फहादने स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केलं आहे. आता दोघेही कुटुंबीय व मित्रांच्या साक्षीने येत्या मार्चमध्ये लग्न करणार आहेत. फहाद हा स्वरापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. त्याचा जन्म उत्तर प्रदेशमधील बहेरी येथे झाला आहे. अलिगढ युनिव्हर्सिटीतून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. यानंतर मुंबईच्या 'टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस'मधून एमफील केलं. विद्यार्थी नेता म्हणून फहाद राजकारणात आला. समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेचा तो अध्यक्ष बनला. सीएए एनआरसी आंदोनलादरम्यान तो चर्चेत आला. आंदोलनात पक्षाकडून त्याने बरंच काम केलं. जुलै २०२१ मध्ये फहाद समाजवादी पार्टीत आला. सध्या फहाद समाजवादी पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. दुसरीकडे स्वरा भास्करही सीएए एनआरसी आंदोलनादरम्यान प्रचंड सक्रिय होती. याचदरम्यान स्वरा व फहादची पहिली भेट झाली होती.