मुंबई : मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांच्यात कपड्यांवरून सुरू झालेले भांडण आता कोर्टात पोहोचले आहे. फैजान अन्सारीने उर्फी जावेदवर बोल्ड कपडे परिधान करून वातावरण बिघडवल्याचा आणि विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. याचबरोबर, उर्फी जावेदने विचित्र कपडे परिधान करायचे सोडून दिले नाही तर तिला मुंबईत राहू देणार नाही, असे फैजान अन्सारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, फैजान अन्सारीने काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदला धमकी सुद्धा दिली होती. तसेच, फैजान अन्सारीने उर्फी जावेदविरोधात मौलानांकडे तक्रार करत, त्यांना तिच्या विरोधात फतवा काढण्यास सांगितले आहे. याशिवाय, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिला कबरीस्तानमध्ये दफन करण्यासाठी जागा दिली जाणार नाही, असेही फैजान अन्सारीने म्हटले होते. फैजान अन्सारीच्या म्हणण्यानुसार, उर्फी जावेदने तिच्या कपड्यांमुळे धर्माची बदनामी केली आहे आणि यामुळे संपूर्ण समुदायाची मान शरमेने झुकली आहे. आता फैजान अन्सारीने उर्फी जावेदला हायकोर्टाची नोटीस पाठवली आहे.
फैजान अन्सारीने शुक्रवारी आपल्या वकिलासमवेत मीडिया संवाद साधला. यावेळी गरज पडल्यास मुंबई हायकोर्टात सुद्धा जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, फैजान अन्सारीने म्हटले की, "उर्फी जावेद देशातील वातावरण खराब करत आहे. उर्फी जावेदसोबत माझी लढाई बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मी अनेक मशिदी आणि कबरीस्तान पत्रे दिली आहेत. मी दिल्ली आणि मुंबईतही पत्रे दिली आहेत. उर्फीविरोधात आता कायदेशीर कारवाई होणार आहे. मी तिला कोर्टात खेचणार आहे."