बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जॉनी लाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने पीडित होते. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जॉनी लाल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते घरीच विलगिकरणामध्ये राहून उपचार घेत होते. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
जॉली लाल यांनी 'रहना है तेरे दिल में' आणि 'मुझे कुछ कहना है' यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटासाठी काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अभिनेता आर. माधवन, तुषार कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.