लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘अशी चिक मोत्याची माळ...’सारखी बरीच गाजलेल्या गाण्यांचे संगीतकार निर्मल मुखर्जी (७२) यांचे मुंबईत निधन झाले. मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुखर्जी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साकीनाक्याजवळील स्मशानभूमीत निर्मल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मल यांनी अरविंद हळदीपूर यांच्या साथीने अरविंद-निर्मल या नावाने बरीच गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांचे ‘गणपती आले माझे घरा’ या कॅसेटमधील ‘अशी चिकमोत्याची माळ...’ हे गाणे तूफान गाजले. नौशाद, मदन-मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, पंचमदा, राजेश रोशन, बप्पी लाहिरी, अमर हळदीपूर, कल्याणजी-आनंदजी, नदीम-श्रवण, अनु मलिक, जतीन-ललित, विशाल-शेखर अशा जवळपास सर्वच संगीतकारांकडे त्यांनी बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे, पखवाज ही वाद्ये वाजवली आहेत. ऱ्हिदमिस्ट असलेल्या निर्मल यांची कोंगोवर हुकुमत होती. अरविंद-निर्मल या जोडीने ‘ग गणपतीचा...’ आणि ‘आले देवाचे देव गणराज...’ हे अल्बमही केले.
‘एक होती वादी’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘झाले मोकळे आकाश’ या चित्रपटालाही या जोडीने संगीत दिले. वयाच्या बाराव्या वर्षापासून निर्मल लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे काम करत होते. निर्मल मुखर्जी यांचे वडील बंगाली आणि आई महाराष्ट्रीयन होती, पण ते मराठीच बोलायचे.