Join us

Ravindra Mahajani Passed Away : प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद घरात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 1:26 AM

मावळ तालुक्यातील आंबे येथे एका बंद खोलीत शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. 

पिंपरी : चांगली कथा-पटकथा, रुबाबदार, देखणे रूप असे  १९७५ ते १९९० या काळात समीकरण आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र ह. महाजनी (Ravindra Mahajani) (७७) यांचे आकस्मित निधन झाले आहे. ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. 

अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

रवींद्र हणमंत महाजनी यांचा कलाप्रवास...महाजनी यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे वडील ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. बालपण मुंबईत. अभिनयाची आवड. लहानपणापासून. नाटकात-चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम. खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली.  शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.

यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’,  ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. सन १९९० नंतर  चरित्र भूमिकां, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या.

टॅग्स :रवींद्र महाजनीमराठी अभिनेता