'अजूनही बरसात आहे' या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद, एका चाहतीने काढली रांगोळी !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:10 PM2021-07-15T17:10:36+5:302021-07-15T17:17:45+5:30
मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी 'लग्न पाहावे करून' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
'अजूनही बरसात आहे' मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. . थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा रसिकांनाही आवडू लागली आहे. मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली आहे. तर उमेश कामत हा तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानेही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मुक्ता आणि उमेश यांनी 'लग्न पाहावे करून' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळींच्याही भूमिका आहेत.
मुक्ता आणि उमेश प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीसाठी तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती. मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, याशिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात 'अजूनही बरसात आहे' या मालिकेची चक्क रांगोळी काढली आहे.
रश्मी ही नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. या रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. मुक्ता आणि उमेश यांनीही रश्मीने काढलेली रांगोळी शेअर करून तिचे आभार व्यक्त केले आहेत. आता मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.