‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेची कथा अनोखी असल्याने ही मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत आकृती शर्मा (कुल्फी), मोहित मलिक (सिकंदरसिंह गिल), अंजली आनंद (लव्हली) या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता एका विशेष भागामध्ये नामवंत पंजाबी पार्श्वगायक सुखविंदरसिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ो या मालिकेत एक गाणे गाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
स्वत: लोकप्रिय गायकाची भूमिका साकारणाऱ्या मोहित मलिकने यावेळी सुखविंदर सिंगकडून गाताना कशा तऱ्हेने हावभाव केले पाहिजेत, देहबोली कशी असली पाहिजे याच्या काही टिप्स घेतल्या. चित्रीकरणाच्या वेळी या दोघांमध्ये बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. यावेळी मोहित मलिकने आपण सुखविंदरसिंगच्या आवाजाचे आणि गाण्यांचे चाहते आहोत, असे त्याला सांगितले. याविषयी मोहित सांगतो, “या चित्रीकरणाच्या वेळी मी आयुष्यात प्रथमच सुखी पाजी यांना भेटलो. त्यांची भेट होताच मी अतिशय उत्साहित झालो होतो. या मालिकेत मी साकारत असलेली व्यक्तिरेखा कशी उभी करायची, याबद्दल मला कोणाकडे तरी विचारणा करायची होती आणि सुखविंदरजींपेक्षा दुसरं कोणी मला याविषयी अधिक चांगली माहिती दिली असती असे मला वाटत नाही. मी त्यांचं हर हर मैदान फत्ते हे गाणं रेडियोवर रोज ऐकत असतो. ते प्रचंड नम्र आहेत. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली.”
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी मोहीत मलिक आणि सुखविंदर सिंग यांची खूपच चांगली गट्टी जमली होती. दोघांनी एकत्र फोटो देखील काढले. मोहितला आपल्या आवडत्या हिरोबरोबर स्वत:चे छायाचित्र काढण्याची संधी यामुळे मिळाली असल्याने तो प्रचंड खूश झाला होता.
सुखविंदर सिंगसोबत मोहित मलिकने चित्रीत केलेला भाग लवकरच प्रेक्षकांना कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हा भाग प्रेक्षकांना आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.