‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात पार्श्वगायक कुमार सानू परीक्षक म्हणून अलीकडेच सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपली काही गाजलेली रोमँटिक गाणी सादर करत परीक्षक आणि स्पर्धकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम बघणारा रॅपगायक बादशहा याने यावेळी सांगितले की तो कुमार सानूचा मोठा चाहता आहे. पण आपणच बादशहाच्या रॅप गायकीचे मोठे चाहते आहोत, असे सांगून कुमार सानूने बादशहाला आनंदाश्चर्याचा मोठा धक्का दिला. या भागात कुमार सानूने गायलेले प्रत्येक गाणे बादशहा रेकॉर्ड करताना दिसत होता.
यासंदर्भात बादशहाने सांगितले, “कुमार सानूजी यांचा मी भक्त आहे. त्यांची गाणी ऐकतच तर मी लहानाचा मोठा झालो. माझ्याकडे एक टी-शर्ट असून त्यावर “कुमार सानू- फॉर लाईफ” असे कॅप्शनही खास डिझाइन करून घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही कुमार सानूजींच्या गाण्याच्या कॅसेटस मुलींना भेट देत असू. रोमँटिक गाण्यांचे ते बादशहाच आहेत.” कुमार सानू म्हणाले, “बादशहा हा माझ्या गाण्यांचा चाहता आहे, ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. पण मी स्वत: बादशहाच्या गायनाचा मोठा चाहता आहे, ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नाही! त्याच्या गाण्यातील साधेपणा आणि नम्रता मला अतिशय आवडतो आणि तीच गोष्ट आजच्या पिढीलाही आवडते. तो एक मेहनती गायक आहे.”
‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणार्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं.या कार्यक्रमात जगभरातील गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करताना दिसतील.
या भागात 12 वर्षांच्या सौम्याबरोबर ‘आँखों की गुस्ताखिया’ हे गाणे गात असलेला कुमार सानू तिचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाले. तिच्या आवाजाची जादू आणि आविष्कार पाहून परीक्षकांपैकी प्रीतमने व्यासपिठावर धाव घेऊन तिला आलिंगन दिले. यानंतर तिला कुमार सानू यांनी एक हार्मोनियम भेट म्हणून दिली. सौम्याने आपल्यावर सोपविलेली गाण्याची जबाबदारी आपल्या आवाजाने आणि सुंदर भावनाविष्काराने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तिला इतका आनंद झाला होता की तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. मला तिच्यासोबत गाणं गाता आलं, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि ती पार्श्वगायन कधी करते आहे, त्याकडे माझं लक्ष लागून राहिलं आहे.