भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता.
मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता. त्याने सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, तुम्ही आज आमच्यात नाहीत यावर मला विश्वासच बसत नाहीये. तुमच्याकडून मी एक गोष्ट शिकलो आहे की, कोणतीही परिस्थिती आली तरी हार पत्करायची नाही.
रितेश सिडवानीने देखील मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले आहे की, मिल्खा सिंग यांच्या निधनाविषयी कळल्यावर खूपच वाईट वाटले. आज आपण आपला एक चॅम्पियन गमावला...
प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुपम खेर, सुनील शेट्टी यांनी देखील मिल्खा सिंग यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.