Join us

अज्जूभाईच्या प्रेरणादायी प्रवासाची 'तूफान' गोष्ट, फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:42 AM

अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर नेहमी दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आता तो पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे तूफान. या चित्रपटात फरहान अख्तर अज्जू भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. हाच अज्जू भाई पुढे अझीझ अली नावाने प्रोफेशनल बॉक्सर होतो. ‘तुफान’ ही आशा, विश्वास आणि आंतरिक शक्तीला आणि जिद्द आणि महत्त्वाकांक्षेची जोड असलेली कथा आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेते परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

फरहान अख्तरने आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका सहजतेने साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. याबद्दल तो सांगतो की, मला नेहमीच चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शकाकडून प्रेरणा मिळते. तसेच माझ्या चित्रपटातील इतर सहकलाकारांकडूनसुद्धा मला प्रेरणा मिळत असते. थोडी फार प्रेरणा यातूनही मिळते जेव्हा मी चित्रपट बनवत नसतो आणि फक्त प्रेक्षकांप्रमाणे चित्रपटाचा आस्वाद घेत असतो. मला तेच चित्रपट आठवतात जिथे कलाकारांनी परफॉर्मन्स करताना स्वतःला पूर्णपणे त्या पात्रात सामावून घेतले आहे. ते परफॉर्मन्स जे अगदी मनापासून, प्रामाणिकपणे आणि खरेपणाने सादर केले आहेत. अशा भूमिका नेहमीच अविस्मरणीय ठरतात. याच पद्धतीने काम करण्याचा माझा कल असतो. 

तर मृणाल ठाकूरने तूफानमधील अनुभव खूप अप्रतिम असल्याचे सांगितले. तिने या चित्रपटात अनन्याची भूमिका साकारली आहे. जी अज्जू भाईला बॉक्सर बनण्यासाठी प्रेरीत करते. या भूमिकेबद्दल ती म्हणाली की, अनन्या थोडीशी जिद्दी आणि ठाम आहे. तिची इच्छा आहे की अज्जू भाईला थोडा आदर मिळावा. वेळ लागेल पण एकना एक दिवस त्याची मेहनत यशस्वी ठरेल. मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली. मला या भूमिकेतून खूप काही शिकायला मिळाले. फरहानकडून खूप काही शिकायला मिळाले. तसेच परेश रावल सर तर अभिनयाची संस्था आहेत.

तूफानची कथा ही जीवनापासून प्रेरीत आहे. या चित्रपटातील सर्व पात्रांशी तुम्ही रिलेट कराल. कदाचित तुम्हांला या पात्रांमध्ये तुमची झलक पहायला मिळेल. बॉक्सर म्हणून नाही तर त्याच्या जीवनातील ध्येय, स्वप्ने आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करेल आणि शेवटी प्रेक्षकांना शिकवणही मिळेल, असे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले.

'तूफान' चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. 'तूफान' चित्रपट १६ जुलैपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :फरहान अख्तरमृणाल ठाकूरराकेश ओमप्रकाश मेहरा