बॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक सिनेमा आहेत ज्यांनी इंडस्ट्री गाजवली आहे. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे आराधना. राजेश खन्ना (rajesh khanna) आणि शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा १९६९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या सिनेमात अभिनेत्री फरीदा जलाल (Farida jalal) यांनीदेखील स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या सिनेमाचं सगळं श्रेय राजेश खन्ना यांना दिलं जातं. मात्र, सिनेमाच्या रिलीजनंतर तब्बल ५५ वर्षांनी फरीदा जलाल यांनी दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
अलिकडेच फरिदा जलाल यांनी 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजेश खन्ना यांचा उल्लेख गर्विष्ठ म्हणून केला. "आराधना ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी राजेश खन्ना यांचा स्वभाव बदलला होता. ते गर्विष्ठासारखं वागू लागले होते. यात आराधना रिलीज झाल्यानंतर तर त्यांचा गर्विष्ठपणा आणखीनच वाढला. ते त्यांच्यासमोर प्रत्येकाला शून्य लेखत होते. मी इतर फिमेल फॅन्ससारखं त्यांच्या मागेपुढे करत नव्हते ज्यामुळे त्यांना माझा राग यायचा. त्यामुळे कायम आमच्यात वाद व्हायचे", असं फरीदा जलाल म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "मी एकदा त्यांना रिहर्सल करुयात असं म्हटलं. तर, माझ्यावर जोरात ओरडले आणि किती वेळा रिहर्सल करायची? असं म्हणाले. त्यावेळी मी अगदीच नवीन होते त्यामुळे मला वाईट वाटलं. आणि, तुम्ही असं कसं काय बोलू शकता असं विचारलं. त्यावर त्यांनी माझ्याशी भांडायला सुरुवात केली."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये फरीदा यांनी आराधनाचं श्रेय राजेश खन्ना यांनाच दिलं. सेटवर अनेकदा वाद झाल्यानंतर या दोघांमध्ये नंतर छान मैत्री झाली. आराधना हा सिनेमा त्यावेळी जवळपास ७५ आठवडे बॉक्स ऑफिसवर गाजला होता.