मुंबई - कर्तृत्व असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो त्यासाठी शॉर्टकट नसतो. एक युवक ग्रामीण भागातून येतो आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं नाव कमावतो. उत्तर प्रदेशातील अलीगडच्या एका शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या समीज गाजी असं या मुलाचं नाव. ज्यांनी ६ हजार रुपये महिना नोकरी सोडून मायानगरी मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. याच मेहनतीतून हा युवक आज अनेक हिट टीव्ही सीरियल्स आणि सिनेमांमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो.
सलीम गाजी सांगतात की, मी एका सर्वसामान्य कुटुंबातून येतो. माझे शिक्षण अलीगडमध्ये झाले. १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढे कामधंदा सुरू करण्यासाठी वडिलांकडून १ लाखाचं कर्ज घेतले. मात्र कामात नुकसान झाल्याने १ लाख रुपये बुडाले. मला वडिलांचे पैसे परत करायचे होते त्यासाठी मी एका मेडिकल दुकानात ६ हजार महिना नोकरी करत होतो. पण हे ६००० खूप कमी होते.
त्यानंतर वडिलांना पैसे देण्यास खूप उशीर होत चालला होता. तेव्हा मित्रासोबत मुंबईला कामाला जायचे ठरवले. २००५ मध्ये अलीगडहून मुंबईला आलो. मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत काम शोधत होतो. सुरुवातीच्या दिवसांत स्ट्रगल करावा लागला. त्यानंतर मला पहिला शो 'एक तुम्हारे निशा' मिळाला त्यातून बरेच काही शिकलो. त्यानंतर प्रसिद्ध टीव्ही शो लेफ्ट राइट लेफ्ट ज्वाईन केला. मग सीआयडीसारखी सीरियल्स मिळाली. तेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये कधी मागे वळून पाहिले नाही असं सलीम यांनी सांगितले.
सीआयडी मालिकेवेळी एडिटिंग शिकलो, त्यानंतर तिथे असिस्टेंट डायरेक्टर म्हणून ८ वर्ष काम केले. असिस्टेंट डायरेक्टरनंतर मी डायरेक्टर म्हणून सीआयडी शो सांभाळला. यापासूनच अनेक मालिका मला डायरेक्टर करायला मिळाल्या. ज्यात बहु हमारी रजनीकांत, संतोषी मा, राजमहल यासारखे टीव्ही सीरीयल्स आणि वेब सिरिज होत्या. आता सलीम गाजी डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीत ओळखले जातात. आतापर्यंत १८-१९ वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केले. त्यात अक्षय कुमार, इमरान हाश्मी, अजय देवगण, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतासोबत सलीम गाजी यांनी काम केले आहे.