Join us

Farooq Shaikh’s 71st birth anniversary: फारूख शेख यांनी पहिला चित्रपट स्वीकारला होता या अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:41 IST

फारुख शेख यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी रेडिओ आणि टिव्हीवर अनेक कार्यक्रम केले.

ठळक मुद्देगरम हवा या चित्रपटाची निर्मिती रमेश सथ्यू यांनी केली होती. एकही पैसे न घेणारा नायक त्यांना चित्रपटासाठी हवा होता. फारुख यांनीदेखील एक रुपयादेखील न घेता या चित्रपटासाठी होकार दिला.

अभिनेते फारूख शेख आज हयात असते तर ते 71 वर्षांचे झाले असते. त्यांचा मृत्यू 27 डिसेंबर 2013 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत झाला. दुबईत ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत फिरायला गेले होते. त्यांनी चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. उमराव जान, साथ साथ, चष्मे बद्दूर, नूरी यांसारख्या चित्रपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. फारुख यांच्या चमत्कार, जी मंत्रीजी यांसारख्या मालिका प्रचंड गाजल्या. तसेच जीना इसी का नाम है या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करत असत. विविध क्षेत्रातील मान्यवारांसोबत ते या कार्यक्रमात गप्पा मारत. 

वडोदरामधील एका छोट्याशा गावात फारूख शेख यांचा जन्म झाला होता. ते एका जमीनदार कुटुंबातील असून अतिशय श्रीमंत वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील हे पेशाने वकील होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने देखील वकील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. फारुख यांनीदेखील वकील बनण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी त्यांनी मुंबईतील सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षणदेखील घेतले होते. पण वकील बनल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हा व्यवसाय त्यांच्यासारख्या लोकांसाठी नाहीये. अनेक केसेसमध्ये निर्णय कोर्टात नाही तर पोलिस स्टेशनमध्येच घेतला जातो असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि त्यामुळे त्यांनी वकिली सोडून दिली. त्यांचे शिक्षण मुंबईतील सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण झाले होते. त्यांना शिक्षणासोबतच खेळ, नाटक या गोष्टींची आवड होती. त्यांना पाच भावंडे असून फारुख सगळ्यांमध्ये मोठे होते. फारुक हे उत्कृष्ट अभिनेते असण्यासोबत उत्कृष्ट क्रिकेटरदेखील होते.

फारुख शेख यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी रेडिओ आणि टिव्हीवर अनेक कार्यक्रम केले. पण पैशांच्या मागे पळणे त्यांना पटत नसे. त्यामुळे ते चित्रपट स्वीकारताना वर्षाला अनेक चित्रपट न स्वीकारता चांगल्या कथानकाचा एखादाच चित्रपट स्वीकारत असत. 

फारुख यांनी 1973 साली प्रदर्शित झालेल्या गरम हवा या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती रमेश सथ्यू यांनी केली होती. एकही पैसे न घेणारा नायक त्यांना चित्रपटासाठी हवा होता. फारुख यांनीदेखील एक रुपयादेखील न घेता या चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटासाठी त्यांना पाच वर्षांनंतर निर्मात्यांनी 750 रुपये दिले होते. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याने त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

फारुख शेख यांनी रेखा, शबाना आझमी यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले असले तरी त्यांची जोडी दिप्ती नवलसोबत जास्त फेमस झाली. दिप्ती खऱ्या आयुष्यातही त्यांची खूप चांगली मैत्रीण होती. फारुख शेख यांचे लग्न रूपा जैन यांच्यासोबत झाले होते. त्यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. नऊ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :फारूख शेख