Join us

स्त्रीशक्तीचा लोकजागर

By admin | Published: January 15, 2016 3:30 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणीसंघर्षाची पार्श्वभूमी लाभलेल्या महाड (जि . रायगड) येथे शुक्रवारपासून २ दिवस चौथे अ.भा. महिला लोककला संमेलन होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणीसंघर्षाची पार्श्वभूमी लाभलेल्या महाड (जि . रायगड) येथे शुक्रवारपासून २ दिवस चौथे अ.भा. महिला लोककला संमेलन होत आहे. त्यानिमित्त...लोेकसाहित्य आणि लोककलांच्या स्वाभाविक, निसर्गदत्त संस्कृतीचे निर्वहन आजपर्यंत स्त्रीशक्तीकडूनच झाले आहे. जात्यावरच्या ओव्या, अंगाईगीतांपासून थेट लावणीपर्यंत महिलांचा प्रवास आहे. वात्सल्य, करुणा, शृंगार अशा रसांचे दर्शन स्त्रीशक्तीच्या लोकजागरातून होते. स्त्रियांना आजही मंदिर प्रवेश नाकारला जातो. त्यांनी दारूबंदीसाठी आवाज उठवला तर त्यांना गावगुंडांच्या आणि पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागते. प्रश्न स्त्रीभ्रूणहत्येचा असो, ग्रामस्वच्छतेचा असो, एड्सविरोधी जनजागृतीचा असो अथवा आदिवासी मातांच्या व बालकांच्या कुपोषणाचा असो, लोककलांसारखे समर्थक माध्यम वरील विविध प्रश्नांवर जनजागरण घडवू शकते. लोकसाहित्य व लोककलांचा संबंध सृजनशक्तीशी असतो. अंगाईगीतांपासून, जात्यावरच्या ओव्यांपासून लावणीपर्यंत लोकसाहित्याचे विविध लोकगीत प्रकार हे स्त्रियांच्या मुखी असतात. त्याचा प्रत्यय देणारे आणि महिला लोककलावंतांच्या माध्यमातून लोकजागर घडविणारे महाड येथे होणारे हे चौथे संमेलन आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंढरपूरच्या प्रख्यात भारूडकार चंदाबाई तिवाडी यांची निवड करण्यात आली आहे. महिला लोककलावंतांची फार मोठी परंपरा केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण भारताला आहे. महाराष्ट्रात लावणी, तमाशा स्त्रियांना वर्ज्य असताना या कलांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, यमुनाबाई वाईकर यांनी केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही महिला लोककलावंतांचे स्थान आणि योगदान मोठे होते. शाहीर केशर जैनू चाँद, शाहीर इंद्रायणी पाटील, शाहीर अंबूताई विभूते, शाहीर अनसूयाबाई शिंदे अशी नावे घेता येतील.बारामतीच्या जैतुनभी या मुस्लीम असणाऱ्या वारकरी महिलेने जातीय सलोख्याची कीर्तने करीत समाजप्रबोधनाची परंपरा राखली. महाराष्ट्रातील मीराबाई असा लौकिक प्रख्यात भजनकार गोदाबाई मुंडे यांनी मिळवला, तर संगीता भोसले, मीराबाई उमप यांनी आंबेडकरी जलसा परंपरा सुरू ठेवली. मंजुश्री खाडिलकरांचे, मानसी बडवे यांचे हरिदासी कीर्तन, चंदाबाई तिवाडी यांचे भारूड ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची ओळख आहे. लावणी वेशीबाहेर होती, ती आता पंचतारांकित झाली. लोकल लावणी ग्लोबल झाली. परदेशात या लावणीचे वैभव मधु कांबीकर, राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर यांनी वाढविले. महिला लोककलावंतांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. केवळ रंजन केले नाही, तर मूल्यांचे शिक्षण दिले. महिला लोककलावंतांच्या कर्तृत्वाला सलाम करणारे आणि महिला सबलीकरणाला गती देणारे महाडचे संमेलन असणार आहे. भारतीय प्रथा परंपरा आणि त्यात महिलांचे स्थान, संत कवयित्री आणि लोकसाहित्य अनुबंध, राजकारणातील महिलांचे स्थान किती असावे आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. या परिसंवादांसोबतच महिला लोककला दिंडी, दुर्गा, स्तुती, पोवाडा, मोगरा फुलला भक्तीचा, आंबेडकरी जलसा, पंडवाणी कव्वाली, लावणी यासोबत स्थानिक कलावंतांचे कार्यक्रमही सादर होणार आहेत. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतील महिला लोककलावंतांचा सहभाग या संमेलनामध्ये वाढणार आहे. भाषेचा अडसर दूर करीत, भावी काळातही लोककला संमेलने सिद्ध होतील, असा विश्वास टाकायला काहीच हरकत नाही. या संमेलनाची मूळ कल्पना लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे व त्यांची पत्नी शैला खांडगे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व प्रख्यात निवेदक संजय भुस्कुटे यांची आहे. स्वागताध्यक्षा अदिती तटकरे आहेत.परिसंवादामध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, रेणू दांडेकर, चित्रलेखा पाटील. ह.भ.प. शैलाताई यादव आणि शारदा धुळप, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. माहेश्वरी गावित, शैला खांडगे, डॉ. प्रकाश खांडगे, हेमसुवर्णा मिरजकर, राजश्री नगरकर, दीपाली विचारे, प्रशांत पवार, मुकुंद कुळे आदी मंडळी वक्ते आहेत.- शैला खांडगे