मराठीत सध्या वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट येत आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. मराठीत अॅक्शनपॅक्ड म्हणता येतील, असे फारच थोडे चित्रपट आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या प्रकारच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मराठीतील अॅक्शनपॅक्ड सिनेमाची उणीव फाइट हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे असे या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे. फ्युचर एक्स प्रॉडक्शनच्या ललित ओसवाल यांनी फाइट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे.
नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ आणि दमदार कथानक असलेला फाइट हा चित्रपट २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेल्या फाईट या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे, कमल ठोके, अासिफ इब्राहिम यांच्यासह जीत मोरे, सायली जोशी, निशिगंधा कुंटे, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापूरकर, अनुप इंगळे, मंगेश नंदे, राहुल फलटणकर, करम भट हे नव्या दमाचे कलाकार आहेत. जीत मोरे या नवोदित तरुणाची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून एक अँक्शन पॅक हिरो या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे. फिरोझ खान यांनी फाईट मास्टर म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटातील अँक्शन्स या उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आल्या असून त्या लक्षात राहण्यासारख्या आहेत.
स्वप्निल महालिंग यांनी फाईट या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखन केले आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन आणि स्वप्निल गोडबोले यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले यांनी गाणं गायलं आहे. त्याशिवाय विकी सक्सेना यांनी रॅप साँग गायलं आहे. प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्निल गोडबोले यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.