बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत असलेला 'फायटर' हा बिग बजेट बॉलिवूड सिनेमा आज(२५ जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. 'पठाण' आणि 'वॉर'चे दिग्दर्शक असलेल्या सिद्धार्थ आनंद यांच्या 'फायटर' सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. पण, प्रदर्शित होताच 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांची चिंता वाढली आहे.
'फायटर' सिनेमा भारतासह परदेशातही प्रदर्शित होणार होता. पण, प्रदर्शनाच्या आधीच 'फायटर' सिनेमावर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आखाती देशांमधील केवळ युएई या देशात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे 'फायटर' सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आखाती देशांतील बंदीनंतर 'फायटर' सिनेमाच्या निर्मात्यांना आणखी एक झटका मिळाला आहे. प्रदर्शित होताच 'फायटर' सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. तमिळक्रॅकर्स, फिल्मीझिला, टेलिग्राम या वेबसाइटवर 'फायटर' ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. त्यामुळे 'फायटर'च्या निर्माच्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, संजीव चोप्रा, अक्षय ओबेरॉय अशी स्टारकास्ट आहे. देशभक्तीवर आधारित असलेल्या या सिनेमात हृतिक, दीपिका, अनिल कपूर आणि करणने स्क्वॉड्रन लीडरची भूमिका साकारली आहे.