सतिश डोंगरेजगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा जेव्हा संपावर जातो, तेव्हा काय होऊ शकते याचा अनुभव अलीकडेच सबंध महाराष्ट्राने घेतलाच. शिवाय बळीराजाचा संघर्ष हा आरपार असतो, हेही यानिमित्त दिसून आले. वास्तविक बळीराजाला आपल्या मागण्यांसाठी नेहमीच लढा द्यावा लागला आहे. त्याचे प्रतिबिंब चित्रपटांमध्येही उमटले आहे. मराठीत तर आजही बळीराजाला केंद्रबिंदू ठेवून दरवर्षाला किमान अर्धा डझन तरी चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. तसेच बऱ्याचशा बॉलिवूडपटांमध्येही शेतकऱ्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...बलराज साहनी (दो बीघा जमीन)१९५३ मध्ये रिलीज झालेला बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आहे. दुष्काळ, गरिबी, शेतकऱ्यांवर सावकारांकडून होत असलेला अत्याचार आदी मुद्दे चित्रपट अतिशय ज्वलंतपणे मांडण्यात आले आहेत. चित्रपटात बलराज साहनी यांनी शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. मनोज कुमार १९६७ मध्ये आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात मनोज कुमार यांनी शेतकऱ्याची अतिशय अविस्मरणीय अशी भूमिका साकारली होती. सुरुवातीच्या काळात शेतकरी असलेले मनोज कुमार भारत-पाक युद्धादरम्यान सैन्यात दाखल होतात. ‘जय जवान-जय किसान’ या घोषणेने प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे मनोज कुमार यांनीच दिग्दर्शन केले आहे. नर्गिस दत्त (मदर इंडिया)१९५७ मध्ये आलेला महबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ या चित्रपटाचा भारतीय सिनेमा जगतातील कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये समावेश केला जातो. आॅस्कर अवॉर्डपर्यंत बाजी मारलेल्या या चित्रपटात राज कुमार आणि नर्गिस दत्त यांनी शेतकऱ्यांची भूमिका बजावली. तर त्यांच्याच मुलांच्या भूमिकेत असलेल्या सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांची भूमिकाही अविस्मरणीय ठरली. गरिबी, उपासमार आणि सावकारीच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची कथा या चित्रपटातून दाखविण्यात आली. सलमान-शाहरूख (करण-अर्जुन)सलमान खान, शाहरूख खान अभिनित ‘करन-अर्जुन’ हा चित्रपट एक ड्रामा आहे. परंतु अशातही यामध्ये सलमान आणि शाहरूख शेतकऱ्याच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. पहिल्या जन्मात ते शेतकरी असून, शेती करताना बघावयास मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले आहे. आमिर खान (लगान)मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान यानेही शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘लगान’ या चित्रपटात तो एका शेतकऱ्याच्या भूमिकेत झळकला होता. दुष्काळात होरपळलेला शेतकरी अन् ब्रिटिश राजवट यांच्यामधील संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात क्रिकेटचा संदर्भ देऊन त्याकाळी शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना दिलेला लढा दाखविण्यात आला. सोहेल खान (किसान)आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोहेल खान याने शेतकऱ्याची भूमिकाही साकारली आहे. ‘किसान’ या चित्रपटात तो शेतकऱ्यांची बाजू मांडताना दिसतो. सोहेल खान याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मित या चित्रपटात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ व अरबाज खान यांनी सोहेलच्या वडील आणि भावाची भूमिका साकारली आहे.
पडद्यावरचा बळीराजा संघर्ष!
By admin | Published: June 21, 2017 3:50 AM