म्हैसूर येथे होणाऱ्या फिल्मोहोलिक फाऊंडेशन आयोजित 'म्हैसूर इंटरनॅशनल वॉटर फिल्म फेस्टिवल' मध्ये 'एक होतं पाणी' या मराठी चित्रपटाची निवड झाली असून या चित्रपटाने विविध नामांकने प्राप्त केली आहेत.यामध्ये येथील या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर यांना या चित्रपटासाठीचा 'सामाजिक आशयघन चित्रपट लेखन' गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या 'एक होतं पाणी' या चित्रपटाची निवड झाली आहे. डॉ.प्रविण भुजबळ व विजय तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांचे असून योगेश अंधारे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे.'एक होता राजा,एक होती राणी.उद्या म्हणू नका,एक होतं पाणी' अशी हट के टॅग लाईन असलेल्या या चित्रपटातून पाण्याची वास्तव दाहकता मांडण्यात आलेली आहे.समजा पाणीच नसेल तर काय होईल? आणि गावात टँकर न आल्याने काय परिस्थिती उद्भवेल? अशा भीषण आशयावर आधारीत असलेल्या या सिनेमाचे लेखन आशिष निनगुरकर यांचे आहे. त्यांनी पाण्याबद्दलच्या वास्तव अनेक गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहेत.याचीच नोंद घेऊन म्हैसूर येथे होणाऱ्या पहिल्या 'म्हैसूर इंटरनॅशनल वॉटर फिल्म फेस्टिवल' मध्ये त्यांना 'सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट लेखन'चा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 'कोरोना'ची परिस्थिती व लॉकडाऊन संपल्यानंतर हा फेस्टिवल म्हैसूर येथे होणार असून यावेळी या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग पार पडणार आहे.त्यावेळी दिग्गज मान्यवरांच्या व कलावंतांच्या उपस्थितीत आशिषला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा चित्रपट मागच्या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित झाला आहे.आतापर्यंत या सिनेमाला विविध फेस्टिवलमध्ये गौरविण्यात आले असून त्यातच आता म्हैसूर येथे होणाऱ्या पहिल्या 'म्हैसूर इंटरनॅशनल वॉटर फिल्म फेस्टिवल' मध्ये या चित्रपटाला "विशेष लक्षवेधी चित्रपटात" व चित्रपटाच्या लेखकाला पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे.