मुंबईतील फिल्मसिटी गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लोकांना रोजगार देत आहे. अभिनेते-अभिनेत्रींशिवाय अनेकांचे आयुष्य फिल्मसिटीच्या आसपासच्या कामावर अवलंबून आहे. फिल्मसिटीमध्ये मुंबई शहरातील लोकांव्यतिरिक्त देशभरातील लोक मोठ्या संख्येने काम करत आहेत. आता मुंबईला टक्कर देणारी फिल्मसिटी योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात उभारण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याठी अक्षय कुमार, बोनी कपूरसह इतर काही ग्रुप आघाडीवर होते. पण, अक्षयच्या हातातून हा प्रोजक्ट निसटला आणइ तो फिल्ममेकर बोनी कपूर यांना मिळाला आहे. बोनी कपूर हे बॉलिवूडची चांदनी अर्थात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पती तर लाखोंच्या हृदयाची 'धडकन' असलेल्या जान्हवी कपूरचे वडील आहेत.
बोनी कपूरच्या बेव्यू प्रोजेक्ट्स आणि 'भूतानी ग्रुप' या कंपनीने आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ फिल्मसिटी विकसित करण्याचं कंत्राट मिळवलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी यमुना द्रुतगती मार्गाजवळ तसेच निर्माणाधीन असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक हजार एकर क्षेत्रफळाचा भूखंड सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
येत्या तीन वर्षांत पहिला टप्पा 230 एकरमध्ये उभारला जाणार आहे. संपूर्ण 1 हजार एकर जमिनीवर एकाचवेळी फिल्मसिटी विकसित करणे सोपे काम नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी 230 एकरवर फिल्मसिटी स्थापन करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये जागतिक निविदा काढण्यात आली होती. जवळपास तीन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. त्याचवेळी सीएम योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये फिल्मसिटी उभारण्याची घोषण केली होती. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या लोकांना सुरक्षित वातावरण देऊ असे ते म्हणाले होते.