Join us

'रामलीला'मधील दीपिकाच्या भूमिकेसाठी अंकिताने दिलं होतं ऑडिशन; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:26 AM

Ankita lokhande: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतमुळे गेला अंकिताच्या हातून भन्साळींचा सिनेमा?

'पवित्र रिश्ता' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (ankita lokhande). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अंकिताने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. अंकिताने मालिकांसह सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात ती झळकली होती. परंतु, या सिनेमापूर्वी तिने संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला या सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. विशेष म्हणजे तिने दीपिका पदुकोणने साकारलेल्या लीला या लीड रोलसाठी ऑडिशन दिलं होतं. परंतु, काही कारणास्तव तिला हा सिनेमा करता आला नाही. अंकिताचा हा किस्सा संदिप सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला.

संदिप सिंह यांच्या आगामी आम्रपाली या वेबसीरिजमध्ये अंकिता झळकणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने संदिप यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी  हा किस्सा सांगितला. संजय लीला भन्साळी रामलीला या सिनेमाचं दिग्दर्शन करत असतांना संदिप, भन्साळी प्रोडक्शनमध्ये सीईओ म्हणून काम करत होते. त्यावेळी रामलीला सिनेमाच्या ऑडिशनसाठी अंकिताने ट्राय केलं होतं. तिचा अभिनय सगळ्यांना आवडला सुद्धा होता. पण, एका गोष्टीमुळे संजय भन्साळी यांनी अंकिताला सिनेमासाठी संधी दिली नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अंकिताचा किस्सा सांगितला.

अंकिताने 'रामलीला'साठी जे ऑडिशन दिलं होतं ते सगळ्यांना आवडलं होतं. पण त्यावेळी त्यांनी ब्लॅक, सावरियाँ, गुजारिश यांसारखे सुपरहिट सिनेमा दिले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या या आगामी सिनेमासाठी स्टार हवी होती. त्यावेळी सिनेमाचं बजेटही खूप जास्त होतं, असं संदिप म्हणाले. त्यावर अंकितानेही तिचं मत मांडलं.

काय म्हणाली अंकिता? 

"मी अशा सिनेमासाठी निदान ऑडिशन तरी दिलं हेच माझ्यासाठी खूप आहे. मी त्यासाठी स्वत:ला लकी मानते. कधी ना कधी संजय लीला भन्साळींसोबत काम करायची संधी मिळेल अशी मला आशा आहे. ज्यावेळी तुम्ही त्यांच्यासमोर काम करता त्यावेळी तुम्हाला एका गोष्टीची जाणीव होते की निदान तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचा प्रयत्न तरी करताय.  पण, मी हॅप्पी न्यू इअर, राम लीला, बाजीराव मस्तानी यांसारखे सिनेमा सोडले ते फक्त सुशांत सिंह राजपूतमुळे. कारण, मी त्याच्यासोबत सिरीअस रिलेशनशीपमध्ये होते. आणि, त्यावेळी मला करिअरपेक्षा लग्न करणं ही प्रायोरिटी वाटत होती", असं अंकिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "जर मी बाजीराव मस्तानी, राम लीला या सिनेमांची ऑफर नाकारली तर पुढे मला पश्चाताप करायची वेळ येईल असंही संजय लीला भन्साळींनी मला सांगितलं होतं. पण, मी लग्नासाठी हे सिनेमा सोडले होते." दरम्यान, अंकिता अलिकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमात झळकली होती. त्यानंतर, आता ती लवकरच संदिप सिंह यांच्या आम्रपाली या अपकमिंग वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या चाहते तिच्या या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :बॉलिवूडअंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतसंजय लीला भन्साळीदीपिका पादुकोण