‘मखना’मुळे फसला हनी सिंग; एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 11:13 AM2019-07-09T11:13:54+5:302019-07-09T11:14:09+5:30
लोकप्रिय रॅपर हनी सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकप्रिय रॅपर हनी सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ‘मखना’ या गाण्यात अश्लिल आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
हनी सिंगच्या ‘मखना’ या गाण्यात महिलांबाबत अभद्र भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत पंजाबच्या महिला आयोगाने या गाण्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीनंतर हनी सिंग आणि भूषण कुमार यांच्याविरोधात पंजाबच्या मोहालीच्या मटौर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवरही भांदवीच्या कलम 294 (गीतांच्या माध्यमातून अश्लिलता पसरवणे) आणि कलम 506 (धमकावणे)सह अन्य काही कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत पंजाबचे गृह सचिव आणि डीजीपींना पत्र लिहिले होते. शिवाय या गाण्यावर बंदी लादण्याची मागणही त्यांनी केली होती. हनी सिंगचे हे गाणे डिसेंवर 2018 मध्ये रिलीज झाले होते. हनी आणि नेहा कक्करने हे गाणे गायले आहे. टी सीरिजच्या यु ट्यूब चॅनलवर हे गाणे रिलीज केले गेले होते. गाण्याचे बोल स्वत: हनीने लिहिले होते.
यापूर्वीही हनीच्या गाण्यावर वाद झाला आहे. 2013 मध्ये हनीच्या ‘मैं हूं बलात्कारी’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. गतवर्षी हनीने दिल चोरी, छोटे छोटे पेग, दिस पार्टी इज ओवर नाऊ, रंगतारी असे गाणे गायले होते. ही सगळी गाणी हिट झाली होती. हनी सिंगने करियरच्या सुरूवातीली रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून सुरूवात केली होती. कॉकटेल (2012)मधील मैं शराबी गाण्यातून त्याला ओळख मिळाली. मध्यंतरी हनी बायपोलर डिसआर्डरने ग्रस्त होता. यामुळे जवळजवळ 18 महिने तो इंडस्ट्रीतून गायब होता. ते 18 महिने माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. या काळात मी माझ्या नोएडातील घरात होतो. मी बायपोलर डिसआॅर्डरने पीडित होतो, असे हनीने सांगितले होते.