AP Dhillon : पंजाबी संगीत जगतातील इंडो-कॅनेडियन रॅपर, गायक आणि प्रसिद्ध रेकॉर्ड प्रोड्यूसर एपी ढिल्लन याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एपी ढिल्लन याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कॅनडातील व्हँकुव्हर येथील एपी ढिल्लनच्या घराबाहेर हा गोळीबार झाला होता. हे हल्लेखोर कोण होते याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गटाने याची जबाबदारी घेतली असून त्यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एपी ढिल्लन याच्या व्हिक्टोरिया बेटावरील घराजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला. याप्रकरणी अमृतपाल सिंह ढिल्लन यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी रोहित गोदाराच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यासंदर्भाती एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये १ सप्टेंबरच्या रात्री एपी ढिल्लनच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचे म्हटलं आहे.
गोदराने धमकी देताना एपी ढिल्लनला सलमान खानशी असलेल्या मैत्रीमुळे हा हल्ला करण्यात आला असं सांगितलं आहे. एवढेच नाही तर सलमान खानपासून दूर राहा आणि मर्यादा ओलांडू नको, अशी धमकीही त्याला देण्यात आली. तसे न केल्यास तुला मारण्यात येईल, असे म्हटलं आहे.
एपी ढिल्लनच्या घराबाहेर गोळीबाराचा एक कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅनडातील सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. "१ सप्टेंबरच्या रात्री दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. मी रोहित गोदारा या गोळीबाराच्या दोन्ही घटनांची जबाबदारी घेतो. सलमान खानला गाण्यात घेतल्याने तुला आनंद होतोय. पण आम्ही तुझ्या घरी आलो तेव्हा बाहेर येऊन तुझी अॅक्शन दाखवायची होतीस. ज्या अंडरवर्ल्डला तुम्ही कॉपी करतोय ते आम्ही स्वतः जगतो. त्यामुळे तू तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर जनावराप्रमाणे तुला मारून टाकू” असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.