प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात नेहमीच मिळणाऱ्या पहिल्या गोष्टीचे अप्रूप वाटत असते. अशीच काहीशी आनंदाची गोष्ट अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याबाबतदेखील घडली आहे. नुकतेच क्रांतीने पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यामुळे क्रांती खूपच आनंदी झाली असल्याचे दिसते. तिच्या या आनंदाविषयी लोकमत सीएनएक्सला क्रांती सांगते, की गेली सात ते आठ वर्षे मी शास्त्रीय नृत्य शिकत आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्यावर मला कधी सादर करण्याची संधी मिळेल, याची वाट पाहत होते. योगायोगाने ही संधी नागपूर येथील राष्ट्रीय महोत्सवामुळे मिळाली. या महोत्सवाची सुरुवात मी सादर केलेल्या माझ्या गणेशवंदनेने झाली. तसेच, यानंतर बाजीराव मस्तानीमधील ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यावर नृत्य केले. माझ्या या गाण्याची कोरिओग्राफी माझ्या गुरू सोनिया परचुरे यांनी केली होती. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. सोनिया ही नृत्याच्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष देत असते. त्यामुळे तिच्याकडून खूप काही शिकायला मिळते. आपल्या कलेला कुठे तरी नवीन कलाटणी मिळाल्यावर त्याचा आनंद अधिकच असतो, असे क्रांती सांगते.
क्रांतीने सादर केले पहिले शास्त्रीय नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 3:35 AM