Join us

रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 9:59 AM

हा सिनेमा मुंबईच्या थिएटरगृहात तब्बल २३ आठवडे चालला.

रामायणावर आधारित 'आदिपुरुष' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. टीझरवर झालेल्या जबरदस्त टीकेनंतर दिग्दर्शक ओम राऊत यांनी बरीच सुधारणा केली आणि हा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. रामायणावर आधारित सिनेमा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मालिका, चित्रपट बनले आहेत. पण तुम्हाला माहितीए का स्वातंत्र्यापूर्वी रामायणावर सिनेमा बनला होता ज्यामध्ये राम आणि सीतेची भूमिका एकाच कलाकाराने साकारली होती.

1917 साली प्रेक्षकांना पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर रामायण बघता आलं. हा मूक चित्रपट होता. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी 'लंका दहन' (Lanka Dahan) या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर सिनेमा आधारित होता. यामध्ये अभिनेते अन्ना साळुंके (Anna Salunke) आणि गणपत शिंदे यांची मुख्य भूमिका होती. गंमत म्हणजे अन्ना साळुंके यांनी केवळ श्रीराम नाही तर सीतेचीही भूमिका साकारली होती. अन्ना साळुंके पहिले अभिनेते होते ज्यांनी सिनेमात डबल रोल प्ले केला. तर गणपत शिंदे हनुमानाच्या भूमिकेत होते.

प्रभू श्रीरामाला १४ वर्षांचा वनवास होतो. नंतर सीतेचं अपहरण होतं. पत्नीच्या सुटकेसाठी श्रीराम वानरसेना घेऊन लंकेत पोहोचतात. रावणाचा वध करुन जानकीसोबत अयोध्येला परत येतात. त्यावेळी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना भलताच पसंतीस पडला होता. कारण रामायण सारखं भव्य काहीतरी पहिल्यांदाच स्क्रीनवर बघायला मिळालं होतं. चित्रपट सुरु असताना श्रीरामाची एंट्री झाली की प्रेक्षक चप्पल काढून बाजूला ठेवायचे. सिनेमात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स बघणं प्रेक्षकांसाठी ट्रीटच होती. हा सिनेमा मुंबईच्या थिएटरगृहात तब्बल २३ आठवडे चालला. तिकीट विक्रीतून झालेली कमाई बॅगमध्ये भरुन बैलगाडीवरुन निर्मात्याच्या ऑफिसमध्ये पोहोचवली जायची.

कोण होते अन्ना साळुंके?

अन्ना साळुंके विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते होते. ते सिनेमॅटोग्राफरही होते. तसंच स्त्रीची भूमिका साकारणारे पहिले कलाकार होते. 1913 मध्ये आलेल्या राजा हरिश्चंद्र सिनेमात त्यांनी रानी तारामतीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. लंका दहन सिनेमात त्यांनी राम आणि सीता या दोन्ही मुख्य भूमिका अतिशय प्रभावशालीपणे साकारल्या.

टॅग्स :सिनेमारामायणबॉलिवूडआदिपुरूष