'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi) 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा, रविवारी 11 फेब्रुवारी रोजी पार पडला. अंतिम फेरीत रमशा फारुकी (Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui ) हिनं बाजी मारली. रमशाला हा शो जिंकल्यानंतर २० लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी मिळाली. आता या पैशांचं ती काय करणार? असा प्रश्न साहजिक तिला अनेकांनी विचारला. या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर तिनं दिलं आहे. जर तिनं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं तर तिच्या चाहत्यांना नक्कीच तिचा अभिमान वाटेल.
नुकतीच रमशा फारुकीनं चाहत्याशी सवांद साधला. यावेळी बक्षिसाच्या रक्कमेचं तू काय करणार आहे? असा प्रश्न तिला चाहत्यांनी विचारला. यावर ती म्हणाली, 'बावधन गावातून मी खूप काही शिकले आहे. पूर्वीची आणि आत्ताची रमशा ह्याच्यात खूप मोठा बदल झाला आहे. ह्याच सर्व श्रेय गावकऱ्यांना आणि शो ला जातं. २० लाखांची रक्कम ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. अजून नेमकं काय करायचं याचा विचार मी केला नाही. याबाबत घरच्या मंडळींसोबत चर्चा करेल'.
पुढे ती म्हणाली, 'पण, मी असं ठरवलं की मिळालेल्या पैशातील एक मोठी रक्कम मी बावधन गावाला दान करणार आहे. गावापासून मला खूप प्रेम मिळालं आहे. एक वेगळी रमशा बावधनला गेली होती आणि आता एक वेगळी रमशा परतली आहे. यात गावाचा खूप मोठा आधार आहे. बक्षिसातील मोठी रक्कम मी बावधन गावासाठी देणार आहे. ज्यामुळे गावतील मुलांना उत्तम शिक्षण घेता येईल', अशी इच्छा तिनं बोलून दाखवली. रमशाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'जाऊ बाई गावात' या महाअंतिम फेरीत रमशा फारुकी, रसिका ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धक होत्या. ‘जाऊ बाई गावात’च्या ट्रॉफीवर नाव कोरत रमशाने विजेतेपदाचा तर अंकिता मेस्त्रीनं उपविजेती ठरली. महेश मांजरेकर, आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत 'जाऊ बाई गावात'ची महाअंतिम फेरी रंगली. 4 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या रिएलिटी शोला तीन महिन्यांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर आपली पहिली विजेती मिळाली. प्रत्यक्ष गावात जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील जीवन जगणे, शेती करणे अशा टास्कसह इतरही आव्हानात्मक टास्क या रिएलिटी शोमध्ये होते.