Join us

FlashBack : अमिताभ बच्चन मला जिवे मारणार होते - परवीन बाबींनी केला होता खुलासा

By admin | Published: April 04, 2017 12:46 PM

अमिताभसोबत परवीनने आठ चित्रपटांत काम केले. हे सर्व चित्रपट हिट ठरले. बॉलिवूडमध्ये यशाची दहा वर्षे पूर्ण होत नाही...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - परवीन बाबी या नावाचा उल्लेख केला की, दिवार, नमक हलाल, अमर अकबर अँथनी, शान, क्रांती, महान या 70 आणि 80च्या दशकातील सिनेमांमधली सुंदर, ग्लॅमरस आणि बोल्ड हिरोईनचा चेहरा अगदी जशाचा तसा नजरसमोर येतो. 4 एप्रिल 1949 रोजी गुजरातच्या जुनागढ येथील राजघरण्यात परवीनचा जन्म झाल्याचे म्हटले जाते. आज त्यांचा 68 वा वाढदिवस आहे... यानिमित्त थोडं फ्लॅश बॅकमध्ये जाऊन जाणून घेऊया काही खास गोष्टी...

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची जोडी एकेकाळी हिट ठरली होती. अमिताभ-परवीन जोडीने एकूण आठ सिनेमांमध्ये काम केले. हे सर्व सिनेमा सुपरडुपर हिट ठरले. बॉलिवूडमध्ये यशाची दहा वर्षे पूर्ण होत नाही तोच 1983 मध्ये परवीन अचानक गायब झाली. यशाच्या शिखरावर असताना ती अचानक गायब झाल्याने सिनेजगतात चर्चेला उधाण आलं होतं.

काहींच्या मते, या काळात ती आध्यात्मिक शांतीच्या शोधात कुठेतरी निघून गेली होती. 1989मध्ये परवीन पुन्हा परतली. पण तोपर्यंत ती इतकी बदलली होती की, लोकं तिला ओळखूही शकत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, परवीन मानसिक आजाराने ग्रस्त होती. अमिताभ बच्चनने माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करून परवीनने एकच खळबळ उडवली होती. तिला मधुमेह आणि तिच्या पायाला गँगरीन झालं होतं. या आजारांमुळे तिच्या शरीरातील काही अवयवांची क्रिया बंद पडली होती. तिच्या आयुष्यातील शेवटची छायाचित्रे पाहून तिचा मृत्यू खरंच खूप वेदनादायक होता, हे दिसून येते.असा मिळाला चित्रपटात प्रवेश - परवीन बाबी ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी लेक होती. पण लहान वयातच परवीनच्या डोक्यावरचे वडिलांचं छत्र हरवले. पण स्वप्नांचा ध्यास घेतलेल्या परवीनने हार मानली नाही. वयाच्या 23 वर्षांत ती मॉडेलिंग क्षेत्रात आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत ती शिक्षणाचेही धडे घेत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तो  अंदाज इतका भावला की  त्यांनी तिला आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. 1973 मध्ये तिने चरित्रम् सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 

प्रेम प्रकरणं परवीनने लग्न केलं नाही. पण तिची अनेक अफेअर्स गाजलीत. परवीनचे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेता कबीर बेदी आणि डॅनी डेंजोंप्पा या तिघांसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे अमिताभ यांच्यासोबतही तिचे नाव जोडले गेले. महेश भट्टसोबतचा तिचा लव्ह सीन बरीच वर्षे चालला. महेश भट्ट यांनी त्यांच्या व परवीनच्या आयुष्यावर आधारित ये लम्हे हा सिनेमाही बनवला होता.

शेवटचे तीन वर्ष ती जगली अज्ञातवासात 2002मध्ये आईच्या निधनानंतर परवीनचे मानसिक संतुलन बिघडले. ती एकाकी पडली. यावेळी ती केवळ एका चर्चच्या संपर्कात होती. ती याच धर्माची अनुयायी होती. तिने आपल्या मृत्यूपूर्वी सर्व ओळखीच्या लोकांशी संपर्क तोडला होता, असे पोलिसांनी सांगितले होते. 20 वर्षांपासून तिच्या शेजारी राहणारे एम. एस. मल्होत्रा यांनीसुद्धा परवीनला इतक्‍या वर्षांमध्ये केवळ 15 वेळा पाहिले होते. आयुष्यभर एकाकीपण भोगलेल्या परवीनचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. 22 जानेवारी 2005 रोजी मुंबईच्या जुहूस्थित घरात तिचा मृतदेह आढळून आला. फ्लॅटबाहेर पडलेली दुधाची पाकिटे आणि वृत्तपत्रांचा ढीग बघून शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली. यावेळी पोलिसांनी दार तोडून परवीनचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.