Join us  

उडता पंजाब : सेन्सॉरचं नाक कापल्याबद्दल हायकोर्टाचे शतश: आभार

By admin | Published: June 17, 2016 3:34 PM

सेन्सॉर बोर्डाची मनमानी सुरू राहिली असती तर तब्बल ८९ सीन कट झालेला हा सिनेमा पार निरस झाला असता आणि चित्रपटाचं सगळं अस्तित्वचं नष्ट झालं असतं.

रेटिंग : **** स्टार

सेन्सॉर बोर्डाची मनमानी सुरू राहिली असती तर तब्बल ८९ सीन कट झालेला हा सिनेमा पार निरस झाला असता आणि चित्रपटाचं सगळं अस्तित्वचं नष्ट झालं असतं. त्यामुळे उच्च न्यायालयाने तुमचं काम सर्टिफेकिट देण्याचं आहे, सेन्सॉर करण्याते नाही असं सांगत सेन्सॉर बोर्डाचं नाक कट केलं आणि इतका सुंदर सिनेमा प्रदर्शित होऊ दिला याबद्दल त्यांचे शतश: आभार...
 
खरं आणि सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आजच्या टेक्नॉसॅव्ही, सोशल मीडियाच्या विश्वात गुरफटलेल्या आजच्या तरूणाईला त्यांच्या एसी ऑफीस आणि सुखासीन आयुष्यातून बाहेर काढून पंजाबमध्ये रुतलेल्या ड्रगच्या समस्येबद्दल हा चित्रपट सांगतो. पंजाबमधील प्रसिद्ध रॉकस्टार टॉमी सिंग (शाहीद कपूर), गरिबीमुळे पिचलेली बिहारमधील राज्यस्तरीय हॉकी प्लेयर (आलिया भट्ट), एक भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी सरताज (दिलजीत) आणि ड्रग्जमुक्तीसाठी काम करणारी एक डॉक्टर प्रीत (करीना कपूर-खान) या चौघांची आयुष्य ड्रग्जच्या समस्येभोवती कशी फिरतात, याची कथा म्हणजेच 'उडता पंजाब'..
 
टॉमी सिंग हा एक यशस्वी पण पक्का ड्रग अॅडिक्ट पॉपस्टार, लोकप्रियतेची लाट ओसरू लागल्यावर त्यासाठी होणार त्याता संघर्ष शाहिदने उत्तम पद्धतीने रंगवला आहे. तर बिहारमधील हॉकी प्लेयर असलेली पण उदरनिर्वाहासाठी पंजाबमध्ये आलेली आलिया पैसे मिळवण्याच्या लोभापायी ड्रगच्या विळख्यात अडकते. हे दोन पॅरलल ट्रॅक सुरू असतानाच पंजाबमधील पोलिस अधिकारी असलेला सरताज हा हफ्त्यासाठी ड्रग्जच्या खुलेआम वाहतुकीकडे दुर्लक्ष करून आयुष्य जगत असतो, मात्र याच ड्रग्जच्या आगीत त्याचे कुटुंब जलते तेव्हा त्याच्यामधला पोलिस जागा होता आणि तो करीनासोबत ड्रग्जची पाळमुळं उखडण्यासाठी झोकून देतो. चार वेगवेगळ्या माणसांची ही आयुष्य एका समस्येपायी कशी एकत्र येतात, अनेकांचे जीवन उद्धव करणारा ड्रग्जचा हा विळखा सोडवण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात, त्यामध्ये त्यांना काय काय अडचणी येतात? हे सगळ या चित्रपटात दिसतं. 
 
अभिषेक चौबेने त्याच्या नेहमीच्याच अतिशय बंदिस्त पद्धतीने हे कथानक मांडलं आहे, बराचसा डार्क असलेला हा चित्रपट अंगावर येतो, पण हेच आजच्या काळातल्या वास्तव आहे.
 
खरं सांगायचं तर या चित्रपटाची खरी स्टार आहे ती आलिया भट.. स्टुडंट ऑफ दि इयरपासून हायवे आणि आता उडता पंजाबपर्यंत झालेलं तिचं ट्रॉन्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. ती अनेकवेळा फक्त डोळ्यांतून बोलते, जे खरंच कौतुकास्पद आहे. त्यानंतर नंबर येतो तो शाहीदचा, एका रॉकस्टारची वागणूक, त्याचा अॅटिट्यूट आणि एका प्रसंगानंतर त्याच्या वागणुकीत झालेला बदल खूप समजूतदारपणे त्याने साकारला आहे. हैदर नंतर हे त्याचं आणखी एक उत्तम काम आहे.
 
पंजाबी चित्रपटातील फेमस स्टार दिलजीत यानेही चित्रपटातील त्याची भूमिका उत्तमपणे निभावली असून त्याच्या कॅरॅक्टरला तो न्याय देतो. करीनाचा या चित्रपटातील वावर सुखद आहे, ब-याच दिवसांनी ती एका चांगल्या भूमिकेत दिसली आहे, मात्र तिच्याऐवजी दुसरी कोणती अभिनेत्री असतं तरी सहजं चालून गेलं असतं, असंच वाटतं.
 
का पहावा ? चांगली गाणी, उत्तम कथाबांधणी आणि ऑफकोर्स आलिया भट्टच्या उत्कृष्ट अभिनयासाठी..
 
काय आहे हा सिनेमा, कशासाठी बघावा आणि का बघू नये हे सांगितलंय या व्हिडीयो रिव्ह्यूमध्ये सीएनएक्सच्या जान्हवी सामंत आणि लोकमतच्या मिनाक्षी कुलकर्णी यांनी...